पांगरमल दारूकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

नऊ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा 20 जणांवर आरोप; 163 साक्षीदार

नऊ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा 20 जणांवर आरोप; 163 साक्षीदार
नगर - पांगरमल येथील विषारी दारूकांडप्रकरणी दोन हजार 396 पानांचे दोषारोपपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने आज येथील न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्याचा तपास "सीआयडी'कडे आल्यानंतर त्यात दोन कलमे व एक आरोपी वाढला असून, आरोपींची संख्या वीस झाली आहे. गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिस, मृत व अत्यवस्थ व्यक्तींच्या कुटुंबांतील व्यक्तींसह 163 साक्षीदार तपासले जाणार आहेत. हा तपास सुरूच राहणार असून, गरज भासल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक काळात पांगरमल (ता. नगर) येथे उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारू वाटण्यात आली. या दारूमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अन्य तेरा जणांना गंभीर बाधा पोचली.

दोघांना कायमचे अंधत्व आले. एकाला अर्धांगवायू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. विषारी दारू पिण्यात आल्याने हा प्रकार झाल्याचे आणि ही दारू नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅंटीनमध्ये तयार केली जात असल्याचे तपासात उघड झाले; मात्र तपासाबाबत शंका उपस्थित करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह यशस्विनी महिला ब्रिगेड व इतर सामाजिक संस्था व संघटनांनी हा तपास "सीआयडी'कडे देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार हा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन 19 एप्रिलपासून "सीआयडी'कडे देण्यात आला. "सीआयडी'चे अतिरिक्त अधीक्षक गणेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका महिन्यात अनेक बाबी तपासल्या. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच कॅंटीनमध्ये ही दारू तयार केली जात होती. रंगासाठी "मिथेनॉल' हे घातक रसायन मिसळले जात होते. पोलिसांच्या तपासात 19 आरोपी निश्‍चित झाले होते. त्यातील सतरा आरोपी अटकेत आहेत. एकाचा पुणे जिल्ह्यात अपघातात मृत्यू झाला. एक जण अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. कॅंटीन चालविण्याचा करार सुरजितसिंग भगतसिंग गंभीर यांच्या नावे असल्याने त्यांनाही यात आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे आता आरोपींची संख्या वीस झाली आहे. अजूनही पोलिस व इतर संबंधितांच्या फोनवरील संभाषणाचा तपास सुरू आहे.

अन्य तपासही "सीआयडी'कडे?
पांगरमल येथे विषारी दारू पिण्यात आल्याने नऊ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर नगर, पारनेर, नेवासे तालुक्‍यांतही विषारी दारू प्यायल्याने काही लोकांचा मृत्यू झाला. त्याबाबत मृत्यू तपासणी अहवाल आल्यानंतर भिंगार कॅम्प, नेवासे ठाण्यात विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. अजूनही काही अहवाल येणे बाकी आहेत. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याने त्याबाबतही गुन्हे दाखल होतील. या गुन्ह्यांचा तपासही "सीआयडी'कडे जाणार असल्याची चर्चा आहे.

दोषारोपपत्रातील आरोपी
भाग्यश्री गोविंद मोकाटे (जिल्हा परिषद सदस्य), गोविंद खंडू मोकाटे (माजी पंचायत समिती सदस्य), मंगल महादेव आव्हाड, भीमराज गेणू आव्हाड, रावसाहेब गेणू आव्हाड, महादेव किसन आव्हाड, मोहन श्रीराम दुगल, जितू ऊर्फ जगजितसिंग किसनसिंग गंभीर, जाकिर कादर शेख, हमीद अली शेख, सोनू ऊर्फ संदीप मोहन दुगल, वैभव ऊर्फ शेखर जयसिंग जाधव, भरत रमेश जोशी, नन्ना ऊर्फ अजित गुलराज सेवानी, याकूब युनूस शेख, दादा ऊर्फ प्रवीण भालचंद्र वाणी, नवनाथ बबन धाडगे, अमित वासुमन मोतीवानी, राजेंद्र बबन बुगे (मृत), सुरजितसिंग भगतसिंग गंभीर.

विषारी दारूमुळे मृत्यू झालेले
पोपट रंगनाथ आव्हाड (वय 40), दिलीप रंगनाथ आव्हाड (वय 45), राजेंद्र खंडू आंधळे (वय 45), राजेंद्र भानुदास आव्हाड (वय 43), सुरेश बाबूराव वाकडे (वय 45), शहादेव भाऊराव आव्हाड (वय 60), भास्कर बन्सी आव्हाड (वय 45) (सर्व रा. पांगरमल, ता. नगर), प्रभाकर शिवाजी पेटारे (वय 45), (रा. दत्ताचे शिंगवे, ता. पाथर्डी), उद्धव मुरलीधर आव्हाड (वय 32, रा. आव्हाडवाडी, ता. नगर).

विषारी दारूमुळे बाधित झालेले
विनोद ऊर्फ प्रभाकर रामभाऊ शेलार (रा. केशव शिंगवे), हिराजी नाना वाकडे, नामदेव यौहान ठोकळ, बाबासाहेब उत्तम आव्हाड, अंबादास दशरथ आव्हाड, आसाराम निवृत्ती आव्हाड, भगवान किसन आव्हाड, आजिनाथ विठोबा आव्हाड, आजिनाथ पाटीलबा आव्हाड, बाबासाहेब शांतवन वाकडे, हरिभाऊ ज्ञानदेव आव्हाड, महादेव गंगाराम आव्हाड, रावसाहेब भानुदास आव्हाड (सर्व रा. पांगरमल, ता. नगर).

Web Title: filling charge sheet by wine case