प्राध्यापक नव्हे, सराईत चोर..!

प्राध्यापक नव्हे, सराईत चोर..!

कोल्हापूर - तो प्राध्यापक आहे, डॉक्‍टरेट मिळवली आहे. त्याची पत्नीही शिक्षिका आहे, तरीही तो दीड वर्ष चोरी करीत होता. तेही फिल्मीस्टाईलने. ज्या व्यावसायिकाच्या घरात चोरी केली त्यांनी त्या प्राध्यापकाला हुशारीने पकडले. सीसीटीव्ही फुटेज दाखविले आणि आता सारवासारव सुरू झाली आहे. पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ नये म्हणून त्याने थेट १२ ते १४ लाख रुपये परत देण्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येते. शहराच्या मध्यवस्तीतील ही घटना आता चर्चेत येऊ लागली आहे; पण पोलिस ठाण्यात पोचलेली नाही. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांच्या घरी दीड वर्ष चोरी होत होती, ते व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी रोज लाखभर रुपये येत होते. घरी फक्त चौघेच, तरीही त्यांच्या घरी दीड वर्ष पाच-आठ-दहा हजार रुपये महिना, पंधरा दिवसांत हिशेबात कमी येत होते. व्यवहार मोठा असल्याने कुटुंबीयांनी याकडे फार गांभीर्याने घेतलेले नाही. 

चौघेही व्यवसायात झोकून देत होते. एके दिवशी व्यावसायिकाच्या मेहुणीला दिलेले दीड लाख रुपये तिने परत आणून दिले. व्यावसायिकाच्या पत्नीने सर्वांसमोर हे पैसे तिजोरीत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले तेव्हा त्यामध्ये पन्नास हजार रुपये कमी असल्याचे निदर्शनास आले.

व्यावसायिकाच्या पत्नीने स्वतःच्या बहिणीला फोन करून याचा जाब विचारला, तरीही तिने दीड लाख रुपये परत केल्याचे स्पष्ट केले. अखेर व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी हा विषय सोडून दिला, मात्र यानंतरही त्यांच्या घरी पाच-दहा हजार लंपास होऊ लागले. अखेर व्यावसायिकाने आणि त्यांच्या मोठ्या मुलग्याने कोणताही गाजावाजा न करता सीसीटीव्ही बसविला. कॅमेराही सहज दिसणार नाही, असा ठेवला. यानंतर ऐन दिवाळीत व्यवसायातील साहित्य, कामगारांचे पगार व इतर म्हणून घरी सुमारे आठ लाख रुपये आणून ठेवले होते. याच सणाच्या काळात व्यावसायिकाचा व्यवसाय तेजीत होता. त्यामुळे त्याने गल्ल्यातील पैसे पत्नीकडे दिले आणि तिजोरीत ठेवण्यास सांगितले.

पत्नीने तिजोरी उघडल्यावर तिला आठपैकी चार लाख रुपयेच दिसले. तिने तातडीने पतीला फोन करून याची कल्पना दिली. व्यावसायिक घरी आले, त्यांनी वस्तूस्थिती पाहून दोन्ही मुलांना तातडीने घरी बोलविले. चौघांत चर्चा झाली. कोणीही पैसे घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर व्यावसायिकाने सीसीटीव्ही फुटेज सर्वांदेखत पाहिले. तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. त्याचांचा भाडेकरू असलेला प्राध्यापकाने ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. व्यावसायिकांनी नातेवाइकांना बोलवून बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी प्राध्यापकाला तुम्हीच चोरी केली असल्याचे सांगितले; मात्र त्यांनी नकार दिला. पाऊणलाख पगार, पत्नीचा पगार असताना मी चोरी कशाला करू, असे तो सांगू लागला. याचवेळी त्या प्राध्यापकाला सीसीटीव्ही फुटेज दाखविले आणि त्याची बोबडी वळली.

फिल्मीस्टाईलने चोरी...
व्यावसायिकाच्या घरी कोणीही नसताना एका दोरीचा वापर करून तो दुसऱ्या मजल्यावरून खाली यायचा. चोरी करून तो पुन्हा दोरीवरून चढून आपल्या फ्लॅटमध्ये जायचा. एखाद्या चित्रपटातील ‘सीन’ असल्याप्रमाणे तो चोरी करायचा. आठवडा-पंधरा दिवसांतून पाच-दहा हजार तो काढून घेत होता. चार लाख चोरी करताना त्याचे फुटेज सीसीटीव्हीतून 
मिळाल्याचे सांगितले जाते. हे फुटेज भागातील काही नागरिकांनी, नातेवाइकांनी पाहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com