फायनान्स कंपनीच लुटीची सूत्रधार - संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

कऱ्हाड - कर्नाटकातील विजापूरच्या कारखान्याने कर्ज मिळविण्यासाठी आणलेली कथित कमिशनची रक्कम ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा म्होरक्‍या दिलीप म्हात्रे यानेच लुटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

कऱ्हाड - कर्नाटकातील विजापूरच्या कारखान्याने कर्ज मिळविण्यासाठी आणलेली कथित कमिशनची रक्कम ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा म्होरक्‍या दिलीप म्हात्रे यानेच लुटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

सातारा व रत्नागिरी पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास करून त्यांचा हा डाव उलटून या प्रकरणातील चार संशयितांना काल पकडले. संबंधितांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विजापूर येथील हिरे देवनूरच्या श्री ज्ञानयोगी शिवकुमार स्वामीजी साखर कारखान्यास कर्ज हवे होते. त्याचा व्यवहार करण्यासाठी ठाणे येथील किंग फायनान्स कंपनीचा दिलीप म्हात्रे याने कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कऱ्हाड येथे बोलावले होते.

त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष गिरीश कृष्णप्पा सारवाड, कार्यकारी संचालक सुधीर बिरादार, त्यांच्याबरोबर आलेले सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक बसवराज चौकीमठ, सुभाष पाटील यांना घेऊन तो येथील महिंद्रा हॉटेलमध्ये गेला. तेथे त्याचा साथीदार महेश भांडारकर याने बोलवलेल्या स्कार्पिओ गाडीमध्ये संबंधितांनी आणलेली साडेचार कोटी रक्कम ठेवली होती. त्या गाडीत कारखान्याचे अध्यक्ष, संचालक बिरादार, चौकीमठ यांच्याबरोबर म्हात्रे आणि भांडारकर बसले आणि ते त्या हॉटेलपासून कऱ्हाडकडे निघाले होते. त्या वेळी म्हात्रे आणि भांडारकर यांचे साथीदार गजानन तदडीकर, संजय सानप ऊर्फ राणे यांनी आपली गाडी त्यांच्या गाडीला आडवी मारली. आपण क्राईम ब्रॅंचचे पोलिस असल्याचे सांगून कार्यकारी संचालक बिरादार आणि अध्यक्ष सारवाड यांना मारहाण करत स्कॉर्पिओतून इनोव्हा गाडीत बसवले.

चौकीमठ यांनाही गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम गाडीत असल्याने त्यांनी उतरण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित स्कॉर्पिओ घेऊन राणे चार साथीदारांसह रत्नागिरीकडे गेला.

त्यांच्याबरोबर दुसरी कारही होती. त्यामध्ये गजानन तदडीकर व मिश्रा होते. त्यादरम्यान या प्रकाराची माहिती शहर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना दिली. त्यांनीही वरिष्ठांना माहिती देऊन तपास सुरू केला. राज्यात नाकाबंदी करण्यात आली. त्यादरम्यान शौचासाठी चौकीमठ हे चिपळूणजवळ उतरले आणि त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर चिपळूणचे पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीवरून संबंधित गाडीचा पाठलाग केला. त्यादरम्यान रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे हेही सहकाऱ्यांशी समन्वय साधून होते. संगमेश्‍वरचे पोलिस निरीक्षक महेश थिटे यांनी संबंधित गाडी संगमेश्‍वर-देवरुख रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास अडविली. गजानन तदडीकर (वय 45, रमेशवाडी, बलदापूर पश्‍चिम कल्याण), विकासकुमार मिश्रा (वय 30, लल्लुसिंग चाळ, जोगेश्‍वरी, मुंबई), महेश भांडारकर (वय 53, वाघबीळ, ठाणे पश्‍चिम), दिलीप म्हात्रे यांना चार कोटी 48 लाख रुपयांसह ताब्यात घेतले. त्यांना रात्रीच कऱ्हाडला आणले. संबंधित सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. उर्वरितांच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून, संबंधितांना मोका लावण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.

* तीन महिन्यांपासून लुटीचा प्लॅन
* ठाण्यात हॉटेलमध्ये आदल्या दिवशी प्लॅनिंगची बैठक
* लुटीसाठी चार गाड्यांचा वापर
* घाटात बदलल्या गाड्यांच्या नंबरप्लेट
* संशयितांनी नावेही सांगितली बोगस
* संशयितांवर बांद्रा, ठाणे शहरात विविध गुन्हे
* बडतर्फ पोलिसाचाही लुटीत सहभाग
* रत्नागिरी पोलिसांची रिवॉर्डसाठी शिफारस

Web Title: finance company loot crime sandeep patil