गडहिंग्लज येथे आगीत घर जळून खाक

गडहिंग्लज येथे आगीत घर जळून खाक

गडहिंग्लज - येथील सुरेश देवेकर यांच्या राहत्या घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले. 45 हजार रोकडसह दीड तोळ्याच्या सोन्याचे दागिने व धान्य, संसारिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही, पण ही आग शॉर्ट सर्कीटने लागली असावी असा अंदाज आहे.

श्री. देवेकर यांचे तेलवेकर गल्लीत जुने घर आहे. त्याला पोटमाळा आहे. पहाटे तीनच्या सुमारास पोटमाळ्यातून धूर बाहेर येवू लागला. दरम्यान, याच घरातील दुसऱ्या जाप्त्यात इंदूबाई देवेकर राहतात. पहाटे त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी ओरड करून सर्वांना उठविले. संपूर्ण लाकडी पोटमाळा आणि तेथे जळाऊ लाकूड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिक घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल तीन तासांनी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.  

संपूर्ण छप्पर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पोटमाळ्यावरून आगीचे लोळ खालच्या खोलीपर्यंत आल्याने खोलीतील भात, सोयाबीन, ज्वारी, साखर, भांडी, कपड्यांसह लोखंडी तिजोरीही आगीतून वाचली नाही. या तिजोरीतील सर्व कपडे, रोख 45 हजार आणि दीड तोळ्याचे मणीमंगळसूत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या घटनेत श्री. देवेकर यांचे 4 लाख 95 हजाराचे नुकसान झाले आहे. तसेच इंदूबाई यांच्या घराच्या छप्पराचा काही भाग जळाल्याने त्यांचे 25 हजाराचे नुकसान झाले आहे. परिसरातील शंभरहून अधिक तरूण आग विझवण्याच्या प्रयत्नात होते. आग लागलेल्या पोटमाळा आणि खोलीतच गॅस सिलेंडर होता. ही आग त्या सिलेंडपर्यंत पोहचली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, आज सकाळी मंडल अधिकारी प्रदीप कोळी, तलाठी अजयसिंह किल्लेदार व कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. पंचनाम्यात पाच लाखाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

आपत्कालीन व्यवस्थेवर नाराजी
पालिकेची अग्निशमन यंत्रणा आहे. तसेच ट्रॅक्‍टरवरील टॅंकरही उपलब्ध आहे. दोन दिवसापूर्वी लागलेल्या एका आगीच्या घटनेवेळी अग्निशमन बाहेर गेली होती. ट्रॅक्‍टर टॅंकर होता, पण त्यात डिझेल नव्हते. अखेर काहींनी डिझेल घालून टॅंकर नेला होता. दरम्यान, आज पहाटेच्या घटनेवेळी हाच अनुभव आला. घटनेची माहिती देण्यासाठी दूरध्वनी केला. पण, कोणीच तो उचलला नाही. अखेर मोटारसायकलने येवून माहिती दिली. त्यावेळीही टॅंकरमध्ये डिझेल नव्हते. पहाटेच्या सुमारास डिझेल टाकून मगच टॅंकर घटनास्थळी आला. आपत्कालीन यंत्रणेबाबत पालिका प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली. 

सुदैवाने जीवीत हानी टळली
श्री. देवेकर पोटमाळ्यावरच तर कुटूंबातील इतर लोक खालच्या खोलीत झोपी गेले होते. आग लागली तेंव्हा त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. इंदूबाई देवेकर यांनी ओरड केल्याने लोक जमा झाल्यानंतर देवेकर कुटूंबियांना जाग आली. ही घटना वेळीच लक्षात आल्यानेच सुदैवाने जीवीत हानी टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com