'या' एमआयडीसीतील उद्योग रामभरोसे! 

श्रीनिवास दुध्याल / सुस्मिता वडतिले 
Monday, 9 December 2019

दिल्लीसारखी दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्याअनुषंगाने उद्योजकांनी आतातरी दक्षता घ्यायला हवी. येथील अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील उद्योजकांमध्ये अग्निरोधक यंत्रणेविषयी जागरूकता दिसून येत नाही. 

सोलापूर : दिल्ली येथील अनाज मंडी परिसरातील एका कारखान्याला आग लागून 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 50 हून अधिक जखमी झाले. अग्निशामक जवानांनी 63 जणांना बचावले. या दुर्घटनेनंतर कारखान्याला फायर क्‍लिअरन्स नसल्याची बाब समोर आली. सोलापुरातील अनेक उद्योजकांमध्येही अग्निरोधक यंत्रणेविषयी जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे दिल्लीसारखी दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्याअनुषंगाने उद्योजकांनी आतातरी दक्षता घ्यायला हवी. येथील अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील उद्योजकांमध्ये अग्निरोधक यंत्रणेविषयी जागरूकता दिसून येत नाही. 

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वावर जयंत पाटील म्हणाले

मआयडीसी येथील अपघातांचे प्रमाण अत्यल्प

फायर ऍक्‍टनुसार येथे सक्षम यंत्रणा उभी करायला हवी, मात्र तशी यंत्रणा दिसून येत नाही. दरवर्षी अग्निशामक दलाकडून आग नियंत्रण यंत्रणेचे नूतनीकरण करून तसा दाखला घ्यायला हवा. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. चिंचोळी एमआयडीसी उद्योजक दरवर्षी नूतनीकरण करून घेतात. बी फॉर्म भरून नोंदणी करतात. अशी पद्धत अक्कलकोट रोड एमआयडीसीतील उद्योजकांमध्ये नाही. त्यामुळे चिंचोळी एमआयडीसी येथील अपघातांचे प्रमाण अत्यल्प व किरकोळ असून, अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे वर्षातून 20 ते 25 आगीच्या दुर्घटना घडून कोट्यवधींची हानी होते. 30 ते 40 टक्के कारखान्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा म्हणून फायर सिलिंडर ठेवले जातात, त्यात मोठ्या कारखान्यांचाही समावेश आहे. मात्र ही यंत्रणा अपुरी आहे. शहरातील मॉल व इतर शोरूममध्ये अग्निरोधक बऱ्यापैकी असल्याचे दिसून येते. 
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे एक अग्निशामक केंद्र मंजूर आहे. चिंचोळी एमआयडीसीकडून मुंबई येथील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे अग्निशामक दल सुरू होईल. 

हेही वाचा : शिवसेना पुन्हा गेली भाजपसोबत; बाजूने केले मतदान

औद्योगिक आगीची कारणे 
निष्काळजीपणा, धूम्रपान, असुरक्षित वेल्डिंग-कटिंग, ज्वालाग्राही द्रव्ये सांडणे, पसरणे, घर्षण, धोकादायक वस्तूंची अयोग्य साठवण, अतिरिक्त उष्णता, धोकादायक विजेची उपकरणे, ठिणग्या, आकाशातून वीज पडणे, यंत्रामधील दोष, रासायनिक प्रक्रिया. 

हेही वाचा : अंकिता रैनाचा सोलापुरात डबल धमाका!

अशी असावी अग्निरोधक यंत्रणा 
औद्योगिक सुरक्षेच्या नियमावलीनुसार प्रत्येक कारखान्यात अग्निशमन यंत्रणा सक्षम असावी. सुरक्षित इलेक्‍ट्रिक साधने असावीत. घातक रसायनांचा साठा असलेल्या ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा उभारावी. कारखान्याला आपत्कालीन दरवाजे असावेत. प्रत्येक कारखानदाराने सक्षम अग्निशमन यंत्रणा (फायर हायडंट), गोदाम असेल तर स्प्रिंकलर सिस्टिम, स्मोक डिटेक्‍टर व हीट डिटेक्‍टर सिस्टिम ज्यामुळे आग लागल्याबरोबर सायरन वाजायला पाहिजे, पाण्याचा हौद, पाण्याची टाकी, फायर पंप आदी यंत्रणा बसवणे अत्यंत आवश्‍यक आहे. 

उत्पादक दक्ष नसल्याचे चित्र 
ऍक्‍ट व रूल्सप्रमाणे अग्निशमन यंत्रणा प्रत्येक कारखान्यात उभारणे आवश्‍यक आहे. मात्र, अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे कोट्यवधींची उत्पादने घेणाऱ्या काही मोठ्या कारखान्यांमध्येही याबाबत उत्पादक दक्ष असल्याचे दिसून येत नाही. ही यंत्रणा नसल्यास भविष्यात भीषण आगीसारख्या आपत्तीला सामोरे जावे लागेल. 
- केदार आवटे, अधीक्षक, महापालिका अग्निशमन दल 

आगीच्या घटना शक्‍यतो सुट्टीच्या दिवशीच 
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे 30 ते 40 टक्के कारखान्यांमध्ये अग्निशामक यंत्रणा चांगल्या स्थितीत आहे. येथील आगीच्या घटना शक्‍यतो सुटीच्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळी कामगार नसताना घडलेल्या आहेत. एमएसईबीच्या लोंबकळणाऱ्या तारांच्या ठिणग्यांमुळे आगीच्या घटना घडत असतात. एमएसईबीने नियमित पेट्रोलिंग करून दुरुस्ती करावी. 
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire potential in MIDC