सरपणासाठी झाडांना आग!

परशुराम कोकणे 
सोमवार, 2 एप्रिल 2018

जाळण्यासाठी फुकटमध्ये लाकूड मिळावे म्हणून झाडांना खालच्या बाजूला आग लावली जात आहे. झाड जाळून चोरून नेणारी एखादी टोळी सक्रिय असावी. झाडांच्या मुळाजवळ आग लावली जाते. मग झाडे पडतात आणि ते लाकूड पळवले जाते. महापालिका आणि देवस्थान समितीने झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करावी. 
- शुभदा देशपांडे, अध्यक्ष, साहाय्य फाउंडेशन

सोलापूर : एकीकडे झाडांची लागवड व्हावी, झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी सरकार, निसर्गप्रेमी संस्था प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे काहीजण सरपण मिळण्यासाठी झाडांच्या खालच्या बाजूला आग लावत आहेत. ते झाड वाळून तुटून पडले की जाळण्यासाठी घेऊन जात आहे. शहरात सिद्धेश्‍वर तलाव परिसरासह अनेक ठिकाणी असा प्रकार सुरू आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. महापालिका प्रशासन आणि देवस्थान समितीने जळणासाठी झाडं तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. 

परप्रांतातून आलेली मंडळी जळणासाठी लाकूड मिळावे म्हणून अशाप्रकारे झाड तोडल्याचे समोर आले आहे. सिद्धेश्‍वर तलावाच्या काठी अनेक झाडं आहेत. होम मैदान, लक्ष्मी मार्केट परिसरात परप्रांतातून आलेली मंडळी जळणासाठी सरपण मिळावे म्हणून झाडांच्या खालच्या बाजूला कचरा गोळा करून आग लावतात. दोन-चार दिवसांत थोडं थोडें करून झाड जळून खाली पडलं की लगेच ते लाकूड चोरून घेऊन जातात. तलावाकाठी फिरायला येणाऱ्या अनेकांनी हा प्रकार पाहिला आहे, पण कोणीही आवाज उठविल नाही किंवा झाड तोडणाऱ्यांना हटकले नाही. साहाय्य फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा देशपांडे यांनी मात्र दोन दिवसांपूर्वी त्या परिसरात फिरायला गेल्यावर एका झाडाच्या खालच्या बाजूला आग लावल्याचे पाहिले. जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीमधील पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण आग विझली नाही. त्यांनी लागलीच देवस्थान समितीच्या कार्यालयात तक्रार केली. तेथील एका शिपायाला सोबत आणले. घागरभर पाणी ओतून आग विझवली. 

अंगावर पडले झाड 
काही दिवसांपूर्वी विजयपूर रोडवर संभाजी तलाव परिसरात दुचाकीवर जाणाऱ्या चित्रकार प्रकाश पोरे यांच्या अंगावर झाड पडले. या घटनेत ते जखमी झाले. झाड कसे काय पडले हे श्री. पोरे यांनी पाहिले असता झाडाच्या खाली आग लावण्यात आली होती. जळणासाठी लाकूड मिळावे म्हणून अशाप्रकारे झाड तोडणे चुकीचे असल्याचे श्री. पोरे यांनी सांगितले. 

जाळण्यासाठी फुकटमध्ये लाकूड मिळावे म्हणून झाडांना खालच्या बाजूला आग लावली जात आहे. झाड जाळून चोरून नेणारी एखादी टोळी सक्रिय असावी. झाडांच्या मुळाजवळ आग लावली जाते. मग झाडे पडतात आणि ते लाकूड पळवले जाते. महापालिका आणि देवस्थान समितीने झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करावी. 
- शुभदा देशपांडे, अध्यक्ष, साहाय्य फाउंडेशन

Web Title: fire on tree in Solapur