वाढदिवसाला होणारी फटाक्‍यांची आतषबाजी थांबणार!

परशुराम कोकणे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

वाढदिवस किंवा अन्य कारणांमुळे रात्री फटाक्‍यांची आतषबाजी करून ध्वनी आणि हवा प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. सोलापूर स्मार्ट सिटीच्या दिशेने जात आहे. नागरिकांनी आपल्या वागण्यात स्मार्टपणा आणण्याची आवश्‍यकता आहे. शहरात कोठेही फटाके उडविण्यात येत असतील तर बिनधास्त तक्रार करा. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

सोलापूर : उत्सवप्रिय सोलापुरात राजकीय नेत्यांसह गल्ली-बोळांतील कार्यकर्त्यांचे वाढदिवसही जल्लोषात साजरे केले जात आहेत. रात्री 12च्या ठोक्‍याला फटाक्‍यांची आतषबाजी करून "हवा' करण्याचा प्रयत्न होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात यापुढे वाढदिवसाला होणारी फटाक्‍यांची आतषबाजी थांबणार आहे. वाढदिवसाला रात्री रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिले आहेत. 

दिवाळीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी गुन्हे शाखेला सक्त ताकीद दिली होती. ठरवून दिलेल्या वेळेशिवाय फटाक्‍यांची आतषबाजी करणाऱ्या 100हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दिवाळीतील प्रदूषणावर नियंत्रण आणल्यानंतर आता पोलिस आयुक्त तांबडे यांनी वाढदिवसाला होणाऱ्या आतषबाजीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाढदिवसाला रस्त्यावर धिंगाणा करत फटाके उडविणाऱ्याला तत्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

सोलापुरात राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह अलीकडे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्तेही रात्री 12 वाजता फटाके फोडून ध्वनी आणि हवा प्रदूषण करीत असल्याचे दिसून येत आहे. पाच-दहा मिनिटे आकाशात फटाक्‍यांची आतषबाजी होत असते. ही फालतुगिरी थांबविण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. 

विशेष पथकाची नियुक्ती 
रात्रीच्या वेळी फटाके उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे विशेष पथक कार्यरत असणार आहे. शहरात कोणत्याही भागात फटाके उडताना दिसल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षातील 0217-2744600 या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वाढदिवस किंवा अन्य कारणांमुळे रात्री फटाक्‍यांची आतषबाजी करून ध्वनी आणि हवा प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. सोलापूर स्मार्ट सिटीच्या दिशेने जात आहे. नागरिकांनी आपल्या वागण्यात स्मार्टपणा आणण्याची आवश्‍यकता आहे. शहरात कोठेही फटाके उडविण्यात येत असतील तर बिनधास्त तक्रार करा. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Web Title: firecrackers on birthday now stop