नभांगणात उद्या नक्षत्रांची आतषबाजी; सिंह राशीत दिसणारा उल्कावर्षाव निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

बलराज पवार
Monday, 16 November 2020

नक्षत्रांच्या मांदियाळीत मंगळवारी (ता. 17) सिंह राशीत दिसणारा उल्कावर्षाव निसर्गप्रेमींसाठी नभांगणातील नक्षत्रांच्या आतषबाजीची पर्वणीच ठरणार आहे.

सांगली : ऐन दिवाळीत नभांगणातही नक्षत्रांचा दीपोत्सव साजरा होत आहे. नक्षत्रांच्या मांदियाळीत मंगळवारी (ता. 17) सिंह राशीत दिसणारा उल्कावर्षाव निसर्गप्रेमींसाठी नभांगणातील नक्षत्रांच्या आतषबाजीची पर्वणीच ठरणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक शंकर शेलार यांनी दिली. 

श्री. शेलार म्हणाले,""सिंह राशीतून दिसणाऱ्या उल्कावर्षावास "लिओनिड्‌स' असेही म्हणतात. हा वर्षाव टेंपल टट्‌ल या धूमकेतूमधून त्याच्या मार्गावर पडलेल्या कचऱ्यामुळे घडतो. रात्री बाराच्या सुमारास पूर्वेला सिंह रास उगवू लागते. तेव्हापासून पहाटे उजाडेपर्यंत उल्का पडताना पाहायला मिळतात. ताशी 15 ते 20 असा उल्कापाताचा दर असतो. सिंह राशीतील मघा नक्षत्रातून उल्का पडताना दिसतात. 

सूर्याकडे येऊन जाणारे धूमकेतू तसेच लघुग्रहांमधील काही द्रव्य त्यांच्या मार्गावर सांडलेले असते. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी जेव्हा हा मार्ग ओलांडते, तेव्हा तेथील कचरा गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो. यावेळी घर्षणाने कचरा पेटतो आणि एक सुंदर तेजस्वी प्रकाश शलाका पाहायला मिळते. याला उल्कापात म्हणतात.

या उल्का वर्षावासारख्या पडतात. काही वेळा मोठा आवाज करीत कोसळणारे प्रकाशगोलही पाहायला मिळतात. त्यांना बोलाईड्‌स असे संबोधतात. उल्कावर्षाव मोकळ्या मैदानातून, घराच्या गच्चीवरुन पाहू शकता. पण शहरापासून थोडे दूर, टेकडीवर अंधाऱ्या ठिकाणी जावे, असे ते म्हणाले. 

पाच ग्रहांचे दर्शन 
स्वच्छ, निरभ्र अशा सायंकाळच्या आकाशात पूर्वेला तांबड्या रंगाचा मंगळ ग्रह लक्ष वेधून घेतो आहे. सध्या त्याची प्रतियुती असल्याने तो नेहमीपेक्षा मोठा, ठसठशीत दिसतो आहे. मध्यमंडलाच्या पश्‍चिमेला तेज:पुंज गुरू आणि मंदप्रभ शनिची सुंदर जोडी पाहायला मिळत आहे. पुढील महिन्यात त्यांची युती आहे. दोघांमधील कमी होणाऱ्या अंतराचे दररोज निरीक्षण करावे. तसेच पहाटे आकाशात पूर्वेला दिसणारा नेत्रदीपक शुक्र, तर छोटासा शांत बुध असे केवळ डोळ्यांनी पाहाता येणारे पाचही ग्रह सध्या दिसत आहेत, तसे ते म्हणाले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fireworks of the meteor shower tomorrow in sky is a boon for nature lovers