दोन कुटुंबांतील वादातून गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन, गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या घटनेत तीन जण जखमी झाले

श्रीरामपूर (नगर) ः शहरातील हुसेननगर भागात लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन, गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या घटनेत तीन जण जखमी झाले. जमावाने औरंगाबादच्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिस सूत्रांनी सांगितले, की हुसेननगर येथे महेरू निसार शेख व रिजवाना फरीद शेख या शेजाऱ्यांमध्ये दोन घरांच्या मधल्या जागेवरून वाद आहेत. काल (ता. 12) सायंकाळी दोन्ही कुटुंबांतील मुले या जागेत खेळत असताना या दोन्ही कुटुंबांत वाद झाले. या प्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावरूनच आज सायंकाळी महेरू शेख हिचे नातेवाईक शेख रफद शेख रशीद (वय 26, रा. औरंगाबाद) व सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (वय 37, रा. पढेगाव, औरंगाबाद) मोठ्या वाहनातून तेथे आले. त्यांनी रिजवाना शेख यांच्या घरातील सदस्यांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात जमील रशीद शेख (वय 60), फरीद रशीद शेख (वय 38) व शरीफ रशीद शेख (वय 35) जखमी झाले. या प्रकारामुळे परिसरात मोठा जमाव जमला. जमावातील काहींनी गोळीबार करणाऱ्या दोघांना पकडून ठेवले. 

माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाने पकडलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकी व एक मोटर जप्त केली. मोटारीतून एक तलवारही हस्तगत करण्यात आली. गावठी पिस्तूल आरोपींनी फेकून दिल्याने त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, जमावाशी झटापटीत रफद शेख व मुजीब सय्यद किरकोळ जखमी झाले. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing from a dispute between two families