पलूसमध्ये भरदिवसा उद्योजकावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

पलूस- येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ (वय 54) यांच्यावर आज दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी मोटारीवर गोळीबार केला. काच फुटून गोळी चालक बाजूच्या सीटमध्ये घुसली. श्री. वेताळ हे थोडक्‍यात बचावले. भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

पलूस- येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ (वय 54) यांच्यावर आज दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी मोटारीवर गोळीबार केला. काच फुटून गोळी चालक बाजूच्या सीटमध्ये घुसली. श्री. वेताळ हे थोडक्‍यात बचावले. भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 
पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, उद्योजक वेताळ यांची पलूस एमआयडीसीमध्ये फौंड्री आहे. आज सकाळी ते फौंड्रीत गेले होते. दुपारी काम आटोपल्यानंतर जेवणासाठी घराकडे मोटारीतून निघाले. मोटारीत ते एकटेच होते. स्वत: मोटार चालवत ते एमआयडीसीतून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा नंबर एकजवळील घरासमोर आले. घरासमोर मोटार आल्यानंतर अचानक डाव्या बाजूने दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांच्या चेहऱ्याला रूमालाने बांधले होते. दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाने काचेवरून वेताळ यांच्यावर गोळीबार केला. काच फुटून गोळी आतमध्ये वेताळ बसलेल्या जागेवरील सीटमध्ये घुसली. खाली वाकल्यामुळे ते थोडक्‍यात बचावले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात नागरिक गोळा झाले. तेवढ्यात दुचाकीस्वार पळाले. 

गोळीबाराचा आवाज ऐकून वेताळ यांच्या घरातील लोक धावले. गोळीबार झाल्याचे पाहून सर्वजण घाबरले. पलूस पोलिस ठाण्यात तत्काळ गोळीबाराची माहिती देण्यात आली. त्यामुळे सहायक निरीक्षक विकास जाधव तत्काळ घटनास्थळी धावले. तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले पथकासह घटनास्थळी धावल्या. त्यांनी श्री. वेताळ यांच्याकडे गोळीबाराबाबत चौकशी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोर कोण होते? गोळीबार कशासाठी केला? याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही. मात्र गोळीबाराबाबत पलूस परिसरात चर्चा रंगली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firing on industrialist in palus