श्रीरामपुरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या घटनेतील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.

श्रीरामपूर ः पूर्ववैमनस्यातून दोन गटात वादावादी तसेच हाणामारी होवून गोळीबार करण्यात आला. खैरीनिमगाव (ता. श्रीरामपूर) येथे काल रात्री ही घटना घडली. फिर्यादीत गोळीबाराचा उल्लेख असला तरी पोलिसांच्या तपासात मात्र तसे आढळून आलेले नाही.

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या घटनेतील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.

शहरातील पंजाबी कॉलनीत राहणाèया हॅपी उर्फ अमरप्रितसिंग सरबतसिंग सेठी याच्या मालकीचा खैरीनिमगाव येथे फार्म हाऊस आहे. हॅपी, त्याचा मित्र कृष्णा सतिष दायमा व हरजितसिंग चरणसिंग चुग हे तिघे तेथे गेले होते. हॅपी सेठी याचे पूर्वीपासून गोंधवणी येथील सागर विजय धुमाळ, अंकुश रमेश जेधे व नमोद अरुण कांबळे, महेश बोरुडे यांच्याशी वाद आहेत. हे देखील सेठी याच्या फार्म हाऊसवर गेले. तेथे त्यांच्याच वाद झाले.

यावेळी हाणामारी व चाकू हल्ला झाला. आरोपी सागर धुमाळ याने दोन लाख रुपयांची मागणी केली. ती दिली नाही म्हणून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. मात्र सावधगिरी बाळगल्याने गोळी लागली नाही, असे सेठी याने फिर्यादीत म्हटले आहे. सागर धुमाळ याने दुसरी फिर्याद दिली असून मागील भांडणाच्या वादातून हॅपी सेठी याने चाकूने व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केल्याचे म्हटले आहे. 

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही गुन्हयात खूनाचा प्रयत्न, मारहाण, भारतीय हत्यार अधिनियम आदि कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. महेश बोरुडे हा जखमी असल्याने त्याला लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात गोळीबार झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing in Shrirampur