सांगली : इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअर झाली पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

पुढील पाच वर्षात ग्रामपंचायतीला तिच्या शिक्षणाचा फायदा मिळेल अशी आशा आहे. 

विसापूर (सांगली) : इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरची पदवी प्राप्त केलेली येथील कु. ज्ञानेश्वरी कांबळे विसापूर (ता. तासगाव) ग्रामपंचायतीची सदस्य झाली आहे. सर्वात लहान वयात ग्रामपंचायतीत काम करण्याची तिला संधी मिळणार आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून आतापर्यंत उच्चशिक्षण घेतलेली ती एकमेव महिला सदस्य आहे. पुढील पाच वर्षात ग्रामपंचायतीला तिच्या शिक्षणाचा फायदा मिळेल अशी आशा आहे. 

येथील मधुकर कांबळे रोड रोलरचे चालक म्हणून काम करतात. ज्ञानेश्वरी त्यांची मुलगी आहे. ती इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरचा डिप्लोमा झाली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्यांच्या प्रभागात मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण होते. राखीव पदासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे जोडूण तीने अर्ज दाखल केला. याबरोबरच  बाजीराव कांबळे यांनी पॅनेलकडून पत्नीचा तर ज्ञानेश्वरीने अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र मनाचा मोठेपणा दाखवत बाजीराव कांबळे यांनी पत्नीचा अर्ज माघारी घेतला. त्यामुळे अपक्ष असुनही ज्ञानेश्वरीची निवड बिनविरोध झाली. 

हेही वाचा - अयोध्येचे राम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल : दादा वेदक -

ज्ञानेश्वरीची आजी स्व. फुलाबाई कांबळे याही ग्रामपंचायत सदस्य होत्या. मात्र त्या सरपंच पदापासून वंचित राहील्या. सरपंच पद राखीव महिला असे झाल्यास ज्ञानेश्वरीला संधी मिळणार काय अशी चर्चा आहे. बिनविरोध निवड झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचे प्रचंड कौतुक झाले. तीने निवडीचे सारे श्रेय बाजीराव कांबळे सह जेष्ठ नेते शंकरदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, माजी सभापती पतंग बापू माने, माजी सरपंच बळवंत चव्हाण, आरपीआयचे नेते प्रमोद अमृतसागर,खा. संजयकाका पाटील यांचे स्वीय सहाय्यक दिपक अमृतसागर, उमेश माळी यांना दिले. अपक्ष असले तरी आघाडी सोबत राहू असे तीने सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first electronic engineer student select on grampanyat member in tasgaon sangli