देशातील पहिली अखंड शिवज्योत सांगलीत तेवणार

शिवराज्याभिषेकदिनी प्रारंभ; गुलाबराव पाटील ट्रस्टच्या उपक्रमास मान्यता, अत्याधुनिक तंत्र वापरणार
jyot
jyotSakal

सांगली - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता सांगलीतील अश्‍वारूढ पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी शिवज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी ही देशातील पहिलीच शिवज्योत असेल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.

ते म्हणाले, ‘‘सांगलीतील मारुती चौकात १९६२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला. हा पुतळा म्हणजे स्फूर्तीस्थळ बनले आहे. या पुतळ्याशी प्रत्येक सांगलीकर हा जोडला गेला आहे. या प्रेरणास्रोतासमोर कायमस्वरूपी ज्योत प्रज्वलित केली जावी अशी संकल्पना वीरेंद्र पाटील यांनी मांडली. देशात कोठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अखंड शिवज्योत नसल्यामुळे सांगलीत प्रथमच ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, फाउंडेशन व सर्व शिवप्रेमी संघटना, मंडळे यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

महानगरपालिका प्रशासन, सर्व राजकीय पक्ष आणि शिवप्रेमींची उपक्रमाला संमती मिळालेली आहे. मारुती चौकातील पुतळ्याच्या शेजारी ज्योत अखंड तेवत ठेवली जाणार आहे. त्यासाठी स्तंभाची उभारणी सुरू आहे. स्तंभ उभारणीसाठी पाच गडांवरील माती आणि पाच नद्यांचे पाणी आणले आहे. सांगलीतील अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी रायगडावरून ती आणली जाणार आहे. पाच जून रोजी कार्यकर्ते रायगड मुक्कामी जातील.

छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पूर्वसंध्येला ज्योत प्रज्वलित केली जाईल. सहा जून रोजी पहाटे दौडीने व मोटारीने ज्योत सांगलीकडे आणली जाईल. सायंकाळी सहाच्या सुमारास बारा बलुतेदार, अठरा पगड जातीच्या मावळ्यांच्या उपस्थितीत तसेच शिवप्रेमी व्यक्तीच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन होईल.’’ मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, फाउंडेशनचे बिपीन कदम, रवी खराडे, सनी धोत्रे, आयुब निशाणदार आदी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

संकल्पना मांडणारे वीरेंद्र पाटील म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवज्योत अखंडपणे तेवत ठेवली जाणार आहे. सीएनजी तीन ते चार सिलिंडरमधून स्तंभावरील मशालीखाली बर्नरद्वारे गॅस सोडून तो प्रज्वलित केला जाईल. लवकरच तेथे सेफ्टी अलार्म यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. महापूर आला तरीही ही ज्योत प्रज्वलित राहील एवढ्या उंचीवर मशाल असेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com