बेळंकी येथील पार्श्‍वनाथ मूर्ती पाचशे वर्षांपूर्वींची

बेळंकी येथील पार्श्‍वनाथ मूर्ती पाचशे वर्षांपूर्वींची

सलगरे - बेळंकी (ता. मिरज) येथील पार्श्‍वनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान पार्श्‍वनाथ आणि भगवान नेमिनाथ यांच्या प्राचीन जैन मूर्ती आहेत. त्यापैकी दोन मूर्तींवर पाचशे वर्षांपूर्वीचे उल्लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमिनाथ मूर्तीच्या पीठावर इसवी सन १५२१  मधील लेख आहे. मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत या गावात छोटेखानी पार्श्‍वनाथ जैन मंदिर आहे. या मंदिरात भगवान पार्श्‍वनाथांच्या लहान-मोठ्या अशा पाच मूर्ती आहेत. शिखर मंदिरात या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या अभ्यासातून हा संदर्भ स्पष्ट झाला आहे. एका पितळेच्या मूर्तीवर आणि शिखर मूर्तीवर देवनागरी लिपीतील लेख आढळून आले. मंदिराच्या शिखर भागात भगवान नेमिनाथांची पद्मासनातील मूर्ती आहे. 

मध्यभागी ‘शंख’ हे नेमिनाथांचे लांछन कोरले आहे. सुमारे  २२ इंच उंचीच्या या मूर्तीच्या पीठावर दोन ओळींचा देवनागरी लेख कोरला आहे. यात संवत १५७८ वृषे मिती वैशाख असा उल्लेख आहे. या लेखात विक्रम संवत ही कालगणना आली आहे. त्यावरून संवत १५७८ म्हणजे इसवी सन १५२१ मधील हा लेख आहे. या लेखातील काही अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. सिबसेटी नामक व्यापाऱ्याने १५२१ मध्ये ही नेमिनाथ मूर्ती दान दिल्याचा तो उल्लेख आहे. आठ इंच उंचीची भगवान पार्श्वनाथांची  पितळेची मूर्तीच्या पीठावर ‘लक्ष्मीसेटी’  नामक  व्यापाऱ्याने मूर्ती दान केल्याचा उल्लेख आहे. 

श्री. कुमठेकर म्हणाले, ‘‘मिरज तालुक्‍यातील बेळंकी  आणि परिसरावर आदिलशहाची राजवट होती. यावेळी इस्माईल आदिलशहा हा गादीवर होता. मिरज हे आदिलशहाचे मुख्य लष्करी केंद्रापैकी एक होते. या अव्वल आदिलशाही काळात बेळंकी सारख्या छोट्या गावात जैन मूर्तीची स्थापना झाल्याचे या मूर्तीलेखांवरून स्पष्ट होते. एकेकाळी बेळंकी गावात जैन समाज मोठ्या प्रमाणात असावा. त्यांच्यापैकी काही दानशूर व्यापारी असावेत. त्यांच्याच देणगीतून बेळंकीत हे मंदिर  बांधण्यात आले असावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com