
भादोले (ता. हातकणंगले) गावात अवघडे कुटुंब राहते. नितीन अवघडे हे बिगारी काम करतात. त्यांच्या घरात दत्तजयंतीनिमित्त प्रतिवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आजही सकाळी घरात पूजा-अर्चेसह महाप्रसादाची धांदल सुरू होती.
कोल्हापूर - दत्तजयंतीच्या महाप्रसादची धांदल सुरू असतानाच खेळता खेळता शिवरत्न अवघडे हा पाच वर्षांचा मुलगा गरम आमटीच्या भांड्यात पडला. तशी भादोले येथील ग्रामस्थांची धावपळ उडाली. कसबसे भांड्यातून त्याला बाहेर काढले. तातडीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा सायंकाळी मृत्यू झाला. घटनेने भादोले व पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
भादोले (ता. हातकणंगले) गावात अवघडे कुटुंब राहते. नितीन अवघडे हे बिगारी काम करतात. त्यांच्या घरात दत्तजयंतीनिमित्त प्रतिवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आजही सकाळी घरात पूजा-अर्चेसह महाप्रसादाची धांदल सुरू होती. प्रसाद तयार करण्याचे काम पूर्ण झाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा लहान मुलगा शिवरत्न हा आत्येभावाबरोबर खेळत होता. उत्सुकतेपोटी त्याने मोठ्या पातेल्यात काय आहे, हे त्याचे झाकण बाजूला करून बघण्याचा प्रयत्न केला. तसा त्याचा तेलकट झाकणावरून हात सटकला आणि तो गरम आमटीच्या भांड्यात पडला. हे अवघडे यांचे शेजारी आप्पासाहेब सांगरूळे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला क्षणात बाहेर काढले. दरम्यान तो भाजून गंभीर जखमी झाला. घटनेमुळे जयंती उत्सवासाठी आलेल्या सर्वच नातेवाईक व मित्रपरिवाराची धावपळ उडाली. शिवरत्नला नातेवाइकांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू होते. नातेवाईक तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत होते; मात्र सायंकाळी जे नको ते घडले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही बातमी कानी पडल्यानंतर नातेवाइकांना धक्का बसला. त्यांनी मोठा आक्रोश केला. याची प्राथमिक नोंद सीपीआर चौकीत झाली. त्याच्या मागे आई, वडील, आजी, आजोबा आणि मोठी बहीण असा परिवार आहे.
घरात उत्सवाची तयारी सुरू असताना नातवाच्या अशा जाण्याने आजीला धक्का बसला. त्यांनी सीपीआरमध्ये मोठा आक्रोश केला. त्यांना धीर देण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनाही अश्रू आवरता आले नाहीत.