तक्रारींचे पंधरा दिवसांत निराकरण करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत आलेल्या तक्रारींचे पंधरा दिवसांत निराकरण करण्याच्या तसेच कारभार पारदर्शी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी आज जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या. कामास विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी बैठकीत दिला. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक चालली. 

अध्यक्ष सौ. महाडिक यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन झालेल्या कामांचा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेतला. बैठकीस पक्षप्रतोद विजय भोजे उपस्थित होते. त्यांनी घेतलेला आढावा असा- ग्रामीण भागात यात्रा सुरू आहेत, त्या ठिकाणी लक्ष देऊन स्वच्छता करावी. त्याचप्रमाणे खाण्यास अयोग्य असणारा बर्फ ग्रामीण भागात सर्रास विकला जातो, याकडेही आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. पशुसंवर्धन विभागात जनावरांच्या डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. आरोग्य विभागातही डॉक्‍टरांची अशीच स्थिती आहे. त्यामुळे काही प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्‍टरविनाच सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा आरोग्याधिकारी यांनी कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या आठ दिवसांत तयार करून द्यावा. शासनदरबारी त्याचा पाठपुरावा करून ही पदे लवकर भरली जातील. जिल्ह्यातील काही शिक्षकांचे पगार थकले आहेत. त्यांचे पगार द्यावेत. त्याचप्रमाणे अन्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. अनेक ठिकाणी अंगणवाड्या मंजूर आहेत; पण अद्याप बांधकाम सुरू केलेले नाही. ही बांधकामे लवकर सुरू करावीत. शिक्षण विभागात सध्या चर्चेचा विषय असलेल्या सुगम, दुर्गम भागाचा आढावादेखील त्यांनी घेतला. समाजकल्याण विभागाच्या शिल्लक साहित्याचे वाटप करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावतळ्यातील गाळ काढण्याबाबतही संबंधित विभागाने लक्ष घालण्यास सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. 

Web Title: Fix complaints within fifteen days