"या' शहरातील "उडान' पुन्हा लांबणीवर 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

कारखान्याने अद्याप दंड भरला नाही 
उच्च न्यायालयाने कारखान्यास 50 हजार रुपयांचा दंड महापालिकेत भरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कारखान्याने अजुनही दंड भरला नाही. न्यायालयाच्या निर्णयाची प्रत अद्याप महापालिकेस मिळालेली नाही. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या तारखेपासून आठ दिवस की, प्रत महापालिकेस मिळालेल्या दिवसापासून किंवा कारखान्याला नोटीस बजावल्यापासून आठ दिवस या संदर्भात काहीच निर्णय महापालिका प्रशासनाला घेता आलेला नाही. 

सोलापूर ः होटगी विमानतळावरील विमानसेवेस (उडान सेवा) अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. पाडकामासाठी जय्यत तयारी केलेल्या जिल्हा प्रशासनाला त्यामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे. त्यामुळे स्मार्ट सोलापूरकरांना नियमित विमानसेवेसाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 12 ऑगस्ट 2017 रोजी पाडकाम सुरु करण्यात आले होते, मात्र त्यावेळी झालेल्या आंदोलनानंतर ते थांबविण्यात आले. तेंव्हापासून चिमणी पाडकामासंदर्भात या ना त्या कारणाने चालढकल सुरुच आहे.  

हेही वाचा... चंद्रकांत पाटील यांनी केली सोलापुरात "ही' भविष्यवाणी 

अहवाल पाठविला 
नगरविकास विभागाने अहवाल मागविल्याने पाडकाम थांबविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले, त्याचवेळी मक्तेदारावर कोणताही दबाव नसल्याचेही ते म्हणाले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशन काळात चिमणीचे पाडकाम करता येणार नाही. नगरविकास विभागाने चिमणी पाडकामासंदर्भात मागणी केल्यानुसार अहवाल अहवाल पाठवून देण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 

"हेरीटेज'मध्ये चर्चा 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील काल गुरुवारी सायंकाळी सोलापुरात होते. त्यावेळी महसूल विभागातील काही अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर चिमणी पाडण्यासंदर्भात काही धोरण त्याचवेळी ठरल्याची चर्चा सोशल मिडीयावरून होऊ लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भर दुपारी बोलावलेली पत्रकार परिषद त्याचाच एक भाग होता अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. 

हेही आवर्जून वाचा... "या'शहरात होतेयं कोट्यवधीची पाणीचोरी 

काय आहे प्रकरण 
सोलापूर विमानतळावरून विमानसेवा करण्यास सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचे आदेश दिले. मात्र त्याची कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, हेलिपॅडच्या परिसरात उभारलेल्या खांबाला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा पंखा लागल्याने निलंग्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुर्घटना झाली. त्यानंतर पालिकेने चिमणी पाडण्यासाठी तातडीने निविदा काढली होती. पहिल्या तीन वेळेस कुणीही निविदा दाखल केली नव्हती. चौथ्यांदा नाशिक येथील कंपनीने निविदा दाखल केली होती, हीच कंपनी आता पाडकाम करणार आहे. 

हेही वाचा... कोण म्हणाले, पक्ष माझ्या बापाचा, मी कशाला घाबरू 

प्रशासनाची तयारी गेली वाया 
सर्वोच्च न्यायालयानेही कारखान्याची याचिका फेटाळल्यावर सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी हटविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका प्रशासनाने संपूर्ण तयारी केली.चिमणी पाडकामासाठी नियुक्त केलेल्या नाशिक येथील विहान कंपनीला 22 लाख रुपयांची अनामत रक्कम देण्यात आली. पाडकामा दरम्यान पुरेसा बंदोबस्त देण्याची व जमावबंदी आदेश काढण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना करण्यात आली, इतकेच नव्हे तर पोलिसांसह शिघ्रकृती दलालाही (रॅपिड ऍक्‍शन फोर्स) नियुक्त करण्याचे नियोजन ठरले. मात्र नगरविकासच्या पत्रामुळे या सर्व तयारीवर पाणी पडले आहे. 

पाडकामाचे होणार होते चित्रीकरण 
चिमणी पाडकामा दरम्यान वाहतूक वळविण्याचे नियोजन, रुग्णवाहिका, पाडकामासाठी स्टॅण्ड जेसीबी व पोकलेन, डंपर, गॅस कटरची सज्जता ठेवण्यात आली. पाडकामाचे चित्रीकरणाचीही व्यवस्था केली गेली. चिमणी पाडकामासाठी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी विहान कंपनीला 22 लाख रुपयांची अनामत देण्यात आली. चिमणी पाडकामाचा संपूर्ण खर्च सिद्धेश्‍वर साखर कारखान्याकडून वसूल केला जाणार आहे. 

हे पहा... पाडकामाबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी (VIDEO) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 'flight' to this 'city' is on long way again