Vidhan Sabha 2019 : जतमधील बोर नदीस पूर; मतदारांना आणले ट्रॅक्‍टरमधून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

जत - तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तिकोंडी गावाजवळून जाणाऱ्या बोर नदीला पूर आल्याने मतदारांची गोची झाली. दुपारी पाणी थोडे उतरल्यानंतर ट्रॅक्‍टरमधून मतदारांना आणून त्यांचे मतदान करुन घेण्यात आले. 

जत - तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तिकोंडी गावाजवळून जाणाऱ्या बोर नदीला पूर आल्याने मतदारांची  गोची झाली. दुपारी पाणी थोडे उतरल्यानंतर ट्रॅक्‍टरमधून मतदारांना आणून त्यांचे मतदान करुन घेण्यात आले. 

कनार्टकमध्ये काल (रविवारी) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कर्नाटकमधून येणाऱ्या बोर नदीची पाणी पातळी वाढली आणि जत तालुक्‍यातील तिकोंडी गावाजवळ असलेल्या दोन पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने त्यावरुन वाहतूक बंद करण्यात आली. एक पूल लवंगा या गावाकडे तर दुसरा पूल कोंत्येव बोबलादकडे जातात. या दोन्ही पुलाच्या पलिकडच्या बाजूला काही वस्त्या आहेत.

तेथील ग्रामस्थांना पुलावरुन पाणी वाहू लागल्याने तिकोंडीमध्ये येवून मतदान करता येणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांचे मतदान रखडले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यामध्ये वाहने घालणेही धोक्‍याचे होते. या वस्त्यांमधील मतदारांचा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असेच चित्र होते. 

कनार्टकमध्ये पाऊस थांबल्यानंतर दुपारी बोर नदीचे पाणी थोडे उतरल्यानंतर त्यामुळे पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली. ही संधी साधून गावातील नेते मंडळींनी या पाण्यात ट्रॅक्‍टर घालून मतदारांना आणून मतदान करुन घेण्याचे ठरवले. त्यानंतर पुलावरुन पाणी असतानाही त्यामध्ये ट्रॅक्‍टर घालून मतदारांना तिकोंडी गावातील मतदान केंद्रावर आणून मतदान करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood to Bore river in Jat Taluka Voters brought through Tractors