मांडवाच्या दारी पुराचं तांडव...

संजय खूळ
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

आयुष्यभर काबाडकष्ट करून उभ्या केलेल्या घरामध्ये मुलाचे थाटामाटात लग्न करायचे, असे स्वप्न त्यासाठी पै पै साठवलेल्या दाम्पत्याने पाहिले. मात्र, पंचगंगेला आलेल्या पुरात त्यांचे हे स्वप्न वाहून गेले. घर आणि लग्नासाठी त्यांनी केलेली सर्व तयारी पुराच्या पाण्यात बुडाली. राजापूर (ता. शिरोळ) येथील विश्‍वनाथ शामराव कांबळे आणि माणिक या कष्टकरी दाम्पत्यावर हे संकट कोसळले आहे.

राजापूर (ता. शिरोळ) : आयुष्यभर काबाडकष्ट करून उभ्या केलेल्या घरामध्ये मुलाचे थाटामाटात लग्न करायचे, असे स्वप्न त्यासाठी पै पै साठवलेल्या दाम्पत्याने पाहिले. मात्र, पंचगंगेला आलेल्या पुरात त्यांचे हे स्वप्न वाहून गेले. घर आणि लग्नासाठी त्यांनी केलेली सर्व तयारी पुराच्या पाण्यात बुडाली. राजापूर (ता. शिरोळ) येथील विश्‍वनाथ शामराव कांबळे आणि माणिक या कष्टकरी दाम्पत्यावर हे संकट कोसळले आहे. मंगळवारी (दि. 20 ऑगस्ट) त्यांच्या घरी लग्नसोहळा पार पडणार होता.
पुन्हा नव्याने घर उभारून मुलाचा नवा संसार थाटून देण्यासाठी या दाम्पत्याला आता नव्याने संघर्ष करावा लागणार आहे.

राजापूर येथील बौध्द वसाहतीमध्ये विश्‍वनाथ आणि माणिक कांबळे हे दाम्पत्य राहते. विश्‍वनाथ हे शेतमजूर आणि वीट भट्टीवर काम करतात तर, माणिक या शेतमजूरी करतात. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी घर उभारले होते. मुलाचे 12 वीचे शिक्षण झाल्यानंतर त्यालाही जयसिंगपुरातील एका औद्योगिक वसाहतीत काम मिळाले. घर आणि मुलाची नोकरी हे स्वप्न पूर्ण झाल्याने मुलाचे लग्न थाटामाटात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कालचा (मंगळवार दि. 20 ऑगस्ट) मुहूर्त निवडला होता. 

 

शिरोळ तालुक्यात महापुराने कहर चालू केला तेव्हा सर्वात मोठी धास्ती या गावातील नागरिकांनी घेतली होती. एकदा का चोहोबाजूंनी पाणी वेढले की, बाहेर पडणे आव्हान असल्याने दोन पिशव्यांमध्ये मिळेल ते साहित्य घेऊन आणि उर्वरीत साहित्य पाण्यात भिजणार नाही, अशा ठिकाणी ठेऊन कांबळे कुटुंब बाहेर पडले. मात्र, पुराच्या पाण्यात लग्नाच्या साहित्यासह इतर सर्व संसार वाहून गेला. संपूर्ण घर पाण्याखाली बुडल्याने पूर ओसरल्यानंतर मातीचे असलेले हे घर जमीनदोस्त झाले. आणि या गरीब दाम्पत्याच्या स्वप्नावर महापुराने घाला घातला.

महापुराने सगळंच नेलं
आज मुलाचं लग्न आम्ही जमेल तसं करायचं ठरवलं होत. मात्र महापुरानं काहीच शिल्लक ठेवलं नाही. आता लग्न करायचं की, पुन्हा घर उभं करण्यासाठी धडपडायचं, हा मोठा प्रश्‍न आमच्यासमोर उभा राहिला आहे.
- माणिक कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood dameged poor family's home and postponed wedding.