शहरांतील श्रीमंत; गावांतील गरीब!

विशाल पाटील
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सरकार शहरी लोकांना धार्जिणे?
शासनाने वेगवेगळी मदत जाहीर करून दुजाभाव निर्माण केला आहे. भाजप सरकार शहरी लोकांना धार्जिणे आहे की काय, अशा तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वास्तविकता ही मदतही अपुरी, तुटपुंजी असून, शासनाने भरीव मदत करणे अत्यावश्‍यक आहे.

सातारा - कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील सुमारे ७६० शहरे, गावांत महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शासनाचा ‘आधार’ पूरग्रस्तांना हवा आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करणारा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरात जास्त तर, ग्रामीण भागात कमी मदत जाहीर करून शासनाने शहरातील लोक ‘श्रीमंत’ आणि ग्रामीण भागातील ‘गरीब’ असतात, असेच जणू काही दाखवून दिले आहे. 

जुलैअखेरपासून पावसाने राज्यातील बहुतांश भागात थैमान घातले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराने ग्रासले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बहुतांश भाग आठवड्याभर 
महापुरात अडकला. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील लोकांची महापुरातून काही दिवसांपूर्वी महापुरातून सुटका झाली. या महापुरामध्ये घरांची, शेतीची तसेच संसारोपयोगी साहित्याचे अगणित नुकसान झाले आहे. जीवनावश्‍यक वस्तू तसेच घरातील आवश्‍यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. मातीच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत, अनेकांचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्य, फर्निचर खराब झाले आहेत. महापुरामध्ये पूरग्रस्तांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. 

महापुराच्या तडाख्यातून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना शासनाच्या मदतीचा ‘आधार’ वाटणार आहे. अशा परिस्थितीत शासनाने पुराने बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर बाधित शहरी कुटुंबासाठी १५ हजार, तर ग्रामीण भागासाठी दहा हजारांची आर्थिक मदत केली आहे. मात्र, ही मदत जाहीर करताना शासनाने दुजाभाव केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शहरे आणि गावे एकमेकांपासून दूर राहिलेली नाहीत.

कपडे, घरगुती साहित्य, वस्तू, उत्पादने, बांधकामाचे साहित्य यांची खरेदी करण्यासाठी शहरी लोकांना जी किंमत मोजावी लागते, तीच किंमत गावातील लोकांना मोजावी लागत आहे. घरांची झालेली पडझड, खराब झालेले साहित्य हे सुध्दा शासनाच्या मदतीत होणार नाही, अशी स्थिती ग्रामीण भागातील लोकांत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Rain Water Loss Help Flood Affected Government