पंढरपुरात पुरस्थिती कायम; 40 गावांचा संपर्क तुटला

भारत नागणे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पूराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांबरोबरच शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या आज सकाळी भीमानदीत संगम येथे  उजनी धरणातून 1 लाख 20 हजार तर वीर धरणातून 62 हजार 173 क्युसेक पाणी सुरू आहे. पंढरपुरात 1लाख95 हजार 43 क्युसेक इतक्या वेगाने पाणी येत आहे.  

पंढरपूर : उजनी व वीर धरणातून पाण्याचा अजूनही भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने पंढरपुरात तिसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व पूल व बंधारे पाण्याखाली गेल्याने तालुक्यातील नदीकाठच्या सुमारे 40 गावांचा पंढरपूर शहरांशी थेटसंपर्क तुटला आहे.

पूराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांबरोबरच शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या आज सकाळी भीमानदीत संगम येथे  उजनी धरणातून 1 लाख 20 हजार तर वीर धरणातून 62 हजार 173 क्युसेक पाणी सुरू आहे. पंढरपुरात 1लाख95 हजार 43 क्युसेक इतक्या वेगाने पाणी येत आहे.  

दोन दिवसांपासून शहर व तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूर स्थिती कायम आहे. प्रशासनाने आता पर्यंत नदीकाठच्या सुमारे 13 हजार लोकांचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर केले आहे. या लोकांना आवश्यक ती मदत दिली आहे.

आज सकाळी काही प्रमाणात पाणी ओसरले असले तरी पुणे जिल्हयात सुरू असलेल्या पावसामुळे पूराचे संकट कायम आहे. पंढरपूर शहराला जोडले जाणारे नगर, सोलापूर, बीड, विजापूर या मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने काल पासून वाहतूक बंद आहे. वाहतूक बंद असल्याने एसटी प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पुराच्या वाढत्या पाण्यामुळे नदीकाठच्या ऊस, मका, केळी या सारख्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष दिपक भोसले व शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा शैला गोडसे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood situation in Pandharpur bhima river overflow