कृष्णेचे पाणी औदुंबरच्या दत्त मंदिरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अंकलखोप - कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने यावर्षीची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यापूर्वी दोनदा पाणी वाढले व कमी झाले. मात्र, आज सकाळपासून दिवसभरात सुमारे चार फूट पाणी वाढले. 

अंकलखोप - कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने यावर्षीची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यापूर्वी दोनदा पाणी वाढले व कमी झाले. मात्र, आज सकाळपासून दिवसभरात सुमारे चार फूट पाणी वाढले. 

औदुंबर (ता. पलूस) येथे दुपारी चार वाजता दत्त मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायरीला कृष्णा नदीचे पाणी लागले. दरम्यान, श्रावण महिन्यातील गुरुवार असल्याने  पहाटेपासून भाविक औदुंबर (ता. पलूस) येथे दत्त मंदिरात येत होते. सकाळी सभामंडपासून पाणी दूरवर होते, मात्र झपाट्याने वाढ झाल्याने दुपारपर्यंत मंदिराला पाण्याचा वेढा पडला. सायंकाळी सभामंडपात गुडघाभर पाण्यात भाविक दर्शन घेत होते. विस्तीर्ण नदीपात्राचे फोटो, सेल्फीचा मोह अनेकांना पडत आहे. पुजारी मंडळींनी मंदिरातील साहित्य वर असणाऱ्या देवघरात हलवले. 

पुजारी केदार व गिरीश जोशी म्हणाले,‘‘यावर्षी प्रथमच गाभाऱ्यात पाणी येणार आहे. ‘श्रीं’च्या पादुकाला पुराचे पाणी लागल्यावरच मूर्ती वरच्या देवघरात हलवल्या जातील. तोवर नियमितपणे आरती व विधी मंदिरातच होतील. वरच्या देवघरात तयारी केली आहे.’’

कोयनेतून ५२ हजार क्‍युसेकने विसर्ग 
सांगली - कोयना धरण परिसरातील पाऊस कायम असल्याने विसर्ग कायम आहे. आज ५२ हजार ३९५ क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. बुधवारपेक्षा ५ हजार क्‍युसेकने विसर्ग कमी केला आहे. कोयनेचे गेट कालपेक्षा अर्धा फुटांनी कमी करून ६ फुटांवर आणले आहेत. बुधवारी विसर्ग वाढविल्यामुळे पाणीपातळी तीन फुटांनी वाढून २६ फूट झाली आहे. जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिली आहे. 

Web Title: Flood Water Krishna River Datta Temple Audumbar