पूररेषेतील घरे हलवावी लागतील - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

भविष्यातील अशा आपत्तींचा सामना करायचा झाल्यास पूररेषेत येणारी घरे संबंधित लोकांची मते बदलून व त्यांना विश्‍वासात घेऊन हलवावी लागतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर - भविष्यातील अशा आपत्तींचा सामना करायचा झाल्यास पूररेषेत येणारी घरे संबंधित लोकांची मते बदलून व त्यांना विश्‍वासात घेऊन हलवावी लागतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, 'लातूरच्या भूकंपावेळी पडलेली घरे दुसऱ्या ठिकाणी बांधून देण्यात आली. कोल्हापूर असो किंवा सांगलीत अशी जमीन मिळणे अवघड आहे. या ठिकाणच्या जमिनी चांगल्या आहेत, त्याला भावही चांगला मिळतो. अनेक जमिनी कसदार आहेत. त्यामुळे अशी घरे हलवताना त्यासाठी चांगल्या आणि उंचीवरील जागेचा शोध घ्यावा लागेल.''

पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असे सांगून पवार म्हणाले, 'पूरग्रस्त लोकांना आता जेवणापेक्षा जीवनावश्‍यक वस्तूंची गरज आहे. अनेकांचे संसार या पुरात वाहून गेले. गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी याचा विचार करून मदत करावी. धान्य, भांडी यांसारख्या वस्तू दिल्या तर त्याचा उपयोग होईल.''

ते म्हणाले, 'उसाचे मोठे नुकसान झाले आहे. मी अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांच्या दहा समित्या केल्या आहेत. या समित्या पूरग्रस्त भागात भेटी देतील. तेथील कारखानदारांशी चर्चा करून उसाचे किती नुकसान झाले, याची माहिती घेतील. संपूर्ण ऊस गेला असेल त्या ठिकाणी कमी कालावधीत येणारे पीक इन्स्टिट्यूटने विकसित केले आहे, त्याची तेथे लागवड केली जाईल. या पिकांना कमी दरात खत पुरवठा करण्यासाठी इफ्कोसारख्या कंपन्यांशी माझी चर्चा झाली आहे, तेही सहकार्य मिळवून देऊ. या भागात सोयाबीन, भात यांसारखी पिकेही आहेत; पण परिस्थिती बघता ही पिके हातात पडणार नाहीत. जनावरेही मोठ्या प्रमाणात दगावली आहेत, अशा लोकांनाही मदतीचा हात सरकारने द्यावा. आता खरा प्रश्‍न शेतमजुरांचा आहे. त्यांना किमान चार महिने काम मिळणार नाही. अशा लोकांना रोजगार हमी योजनेतून काम द्यावे किंवा त्यातून मानधन द्यावे.'

पालकमंत्र्यांना पवारांचा टोला
पाच-सहा दिवसांत परिस्थिती निवळेल, असे समजून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जनादेश यात्रा सुरू केल्याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता "त्यांचे कर्तृत्ववान सहकारी या जिल्ह्यात आहेत, त्यांच्या कामावर मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास असेल', असा टोला पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. सरकारकडे मागितलेली मदतही कमी पडली तर याच कर्तृत्ववान मंत्र्यांचे केंद्रात वजन आहे, त्यातून ते जागतिक बॅंकेचेही कर्ज मिळवू शकतात, अशी टीकाही पवार यांनी पाटील यांच्यावर केली.

कर भरण्यास मुदतवाढ मिळावी
अनेक व्यापाऱ्यांची कागदपत्रे या पुरात वाहून गेलेली आहेत. अशा लोकांना प्राप्तिकर भरायचा असेल तर किमान वर्षाची मुदतवाढ आणि जीएसटीसाठी भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असेही श्री. पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floodline homes have to be moved Sharad Pawar