शिराळा नागपंचमी उत्सवात न्यायालयाचे आदेश पाळा - काळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

शिराळा - नागपंचमी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करा. ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून पारंपरिक वाद्यांचा वापर करा. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांनी दिला.

शिराळा - नागपंचमी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करा. ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून पारंपरिक वाद्यांचा वापर करा. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांनी दिला.

तहसील कार्यालयातील सभागृहात १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमी आयोजनाबाबत पोलिसांमार्फत नगरपंचायत, नागमंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रभारी तहसीलदार के. जे.  नाईक, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, नायब तहसीलदार उदय पवार, मुख्याधिकारी अशोक कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, प्रवीण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. काळे म्हणाले,‘‘नागपंचमी म्हणजे मिरवणूक नव्हे. सामाजिक, आर्थिक उलाढाल, भावना यांचाही विचार करावा. मंडळांनी मिरवणुकांसाठी परवाने घ्यावेत. ध्वनी प्रदूषणाबाबत नोटीस बजावली आहेत त्याचे उत्तर त्या मंडळांनी द्यावे. अन्यथा स्पीकर परवाने देण्यात येणार नाहीत. शिराळाचे नाव उंचावेल, अशी नागपंचमी करा. कायदा, व्यवहार, भाविकांच्या भावनाची सांगड घालून शांततेत नागपंचमी करा.’’

सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे म्हणाले,‘‘गतवर्षी आदर्श व नियोजनबद्धपद्धतीने नागपंचमी झाली. असेच सहकार्य द्या. पारंपरिक वाद्यांचा वापर करा. पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणीच वाहने लावा. अफवा पसरवून सुरक्षिततेबाबत गैरसमज केले जातात. अफवांवर विश्वास ठेऊ नका. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी प्रास्ताविक केले.

उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, गौतम पोटे,  केदार नलवडे, देवेंद्र पाटील, संभाजी नलवडे,  लालासाहेब तांबीट, संजय हिरवडेकर, सीमा कदम, शिवाजी शिंदे, वैभव कुंभार, अजय जाधव, अविनाश खोत, सम्राट शिंदे उपस्थित होते.

Web Title: Follow court orders at Shirala Nagpanchami festival