नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री पाटील यांच्या इशारा

विष्णू मोहिते
Tuesday, 14 July 2020

सांगली, _ सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 641 कोरोना बाधीत झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्‍यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. 

नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री पाटील यांच्या इशारा

सांगली, _ सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 641 कोरोना बाधीत झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्‍यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. 

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव उपस्थित होत्या. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात आजतागायत 641 कोरोना बाधीत आहेत. यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत 304 रूग्ण आहेत तर 11 रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या 641 रूग्णांपैकी ग्रामीण भागातील 474, शहरी भागातील 67 तर महानगरपालिका क्षेत्रातील 100 रूग्ण आहेत. रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे. जिल्ह्यात जवळपास 200 कंटेनमेंट झोन असून ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आराखड्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. 

राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, पुणे, मुंबईहून सांगली जिल्ह्यात आपल्या मूळगावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी अल्पकालावधीसाठी ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास हातभार लागत आहे. अशा लोकांच्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी ये-जा करणे बंद झाले पाहिजे. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी कोरोनाच्या आढावा घेतला. सद्यस्थितीत मिरज सिव्हील हॉस्पीटलमध्ये आयसीयु बेडची संख्या वाढवण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. 

...... 
पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना 

सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास व आवश्‍यक खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे स्पष्ट करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. 50 वर्षावरील आणि कोमॉर्बिडीटी असणाऱ्या लोकांच्या सर्व्हेसाठी महानगरपालिका क्षेत्रात 20 प्रभागांमध्ये 20 पथके कार्यरत करण्यात आली असून लवकरच हा सर्व्हे पूर्ण करण्यात येईल याचाही आढावा त्यांनी घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow the rules, otherwise lockdown again, Guardian Minister Patil's warning