रानात आखला जेवणाचा बेत अन्‌ हजर झाला बिबट्या थेट

Leopard
Leopard

कऱ्हाड - तुम्ही जेवायचा बेत आखून रानात दुचाकीवरून निघालात अन्‌ अचानक समोर बिबट्या आला तर काय कराल? अंगावर शहारे आणणाराच हा प्रसंग ना? पण, त्यातही सावध राहिलात, तर काहीही होणार नाही. हेच दर्शविणारा प्रसंग काल रात्री नऊच्या सुमारास चोरे येथील गुरव मळ्यात घडला.

जेवणाचा बेत आखून रानात निघालेल्या युवकांच्या दुचाकींना चक्क बिबट्याच आडवा आला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. त्यामुळे चोऱ्यातील युवकांनी रानात आखला जेवणाचा बेत अन्‌ त्यांच्या पार्टीलाच हजर राहिला बिबट्याच थेट, असेच म्हणण्याची वेळ आली. 

चोरे, पालेकरवाडी परिसरात वारंवार बिबट्या डोंगरउताराने भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येत असतो. त्याची कल्पना परिसरातील गावकऱ्यांनाही आहे. शक्‍यतो सायंकाळ झाली की शेतकरी बिबट्याच्या भीतीने रानातून घराकडे लवकर जातात. अनेकदा शेतकऱ्यांनाही उसात वावर आढळून आला होता. लोकांना बघून केवळ गुरगुरून तो डोंगराच्या बाजूलाच पसार होतो, अशी स्थिती असतानाही काल चोरे येथील सहा युवकांनी रानात जेवणाचा बेत आखला. मात्र, त्यांनाही कोठे माहीत होते, की त्यांच्या जेवणाच्या पार्टीला चक्क बिबट्याच येणार आहे ते! 

चोऱ्यातील सहा युवकांनी त्यांच्या जेवणाची जमावजमव केली. तीन दुचाकीवरून जेवणाचे साहित्य घेऊन आठनंतरच्या सुमारास ते सहाही युवक रानाच्या दिशेने निघाले. गुरव मळाचा परिसर ओलांडून जात होते. त्याचवेळी काही अंतरावरच रसत्यावर पूर्ण वाढ झालेला बिबट्या दिसला. त्या वेळी दुचाकीच्या लाइटच्या प्रकाशात बिबट्या सहज दिसत होता. युवकांनी त्याचवेळी प्रसंगावधान राखून स्तब्धता बाळगत बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ दिले. त्या क़ाळात त्यांच्यातील एकाने मोबाईलवर बिबट्याची छबी टिपली. त्यामुळे रानाच्या दिशेने निघालेल्या बिबट्या त्या युवकांच्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध झाला. बिबट्याही गेला अन्‌ यांचा जेवणाचा बेतही संपला. मात्र, त्या भागात बिबट्या असल्याचे शिक्कामोर्तबही झाले.

पिंजरा लावण्याची मागणी
चोरे, पालेकरवाडीसह परिसरात बिबट्याचा वावर आहे. तो जनावरांवर हल्लेही करतो, अशी स्थिती असल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. त्याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहे. लवकरात लवकर पिंजरा लावण्याकडे वन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com