कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीसहून अधिक गावांत फुटबॉल फिव्हर

Football Fever in kolhapur
Football Fever in kolhapur

कोल्हापूर - जिल्ह्यातील ४० हून अधिक गावांत आता फुटबॉल फिव्हर असून, रोज सकाळी उपलब्ध असेल त्या मैदानावर, मोकळ्या जागेवर सरावाला वेग आला आहे. कोडोली-वारणा येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेने यंदाच्या हंगामाला प्रारंभ झाला असून, आता शिरोली येथील स्पर्धेसाठी सारे संघ सज्ज झाले आहेत. गडहिंग्लज वगळता इतर ४० गावांत ६०हून अधिक संघ तयार झाले असून, त्यातील ४५ संघ स्पर्धेसाठी  हमखास हजेरी लावतात, असे सकारात्मक चित्र यंदा आहे. 

दरम्यान, केवळ खेळाडू व संघांच्या संख्येतच वाढ झाली असे नाही तर खेळाचा दर्जाही सुधारला आहे. पहाटे उठून मैदान गाठायचे. सुरवातीला तिथे असतील ते दगड-धोंडे उचलायचे आणि त्यानंतर सरावाला प्रारंभ करायचा, असे चित्र अजूनही काही गावांतील मैदानांचे आहे. मात्र, अशा अनेक अडचणींवर मात करत फुटबॉल केवळ रुजलाच आहे असे नाही, तर त्या-त्या गावात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोलेन मेस्सीही तयार झाले आहेत. 

जिल्ह्याचा विचार केला तर पूर्वीपासून गडहिंग्लजमध्ये फुटबॉलला पोषक वातावरण आहे. सध्या एकट्या गडहिंग्लजमध्ये २० संघ आहेत. त्याशिवाय करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्‍यांतील गावांतही आता फुटबॉल रुजला आहे. करवीर तालुक्‍यात सर्वाधिक २२ संघ असून, वडणगे, सांगरूळ, कासारवाडी, पिरवाडी आदी ठिकाणी प्रत्येक हंगामात मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा होतात. गावातल्या संघातून एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याला करिअरच्या दृष्टीने शहरातील अगदी जाणीवपूर्वक फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो आणि त्या शाळा किंवा महाविद्यालयाकडून खेळण्याची संधी मिळताच तिचे सोने केले जाते. गेल्या काही वर्षात करवीर तालुक्‍यातील पाच ते सहा तरुण अशा पद्धतीने फुटबॉलच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. सौरभ पाटीलसारखे काही खेळाडू तर शहरातील प्रमुख संघांकडूनही खेळू लागले आहेत. 

हवे प्रोत्साहन...
केवळ फुटबॉलच्या प्रेमाखातर ग्रामीण भागातील तरुणांची ही धडपड सुरू आहे. विद्यार्थ्यांपासून ते रिक्षा व्यावसायिक, नोकरदार, सेंट्रिंग-फरशी काम करणाऱ्या तरुणांचा त्यात समावेश आहे. सुसज्ज मैदान नसले तरी ते इमाने-इतबारे रोज सराव करतात. हंगामात तर अगदी फ्लड लाईट लावून डे-नाईट सामन्यांचे आयोजन होते. मात्र, त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींसह ‘केएसए’च्या आणखी पाठबळाची गरज आहे.    

संघांची केवळ संख्याच नव्हे तर खेळाचा दर्जाही सुधारला आहे. फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, यासाठी आमचा सतत आग्रह असतो. फेब्रुवारीमध्ये सांगरूळमध्ये भव्य स्पर्धा  होईल.
- संभाजी नाळे, सांगरूळ फुटबॉल क्‍लब

कोडोलीतील नुकत्याच झालेल्या स्पर्धेने हंगामाला प्रारंभ झाला. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून ३६हून अधिक संघ आले. परंतु, आम्हाला केवळ ३२ संघांनाच संधी देता आली. 
- अर्जुन पाटील, कोडोली फुटबॉल क्‍लब

शहर परिसरात वडणगे येथे प्रकाशझोतात होणारी स्पर्धा आता चांगलीच नावारूपाला आली आहे. करवीर लीग या नावानेही येथे स्पर्धा होतात. यंदाची स्पर्धाही भव्य स्वरूपाचीच असेल. 
- अशोक चौगले, वडणगे फुटबॉल क्‍लब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com