esakal | जंगल सफारी करताना जंगल कसं पाहायचे घ्या जाणून
sakal

बोलून बातमी शोधा

forest wild leopard life information pradip sutar sangli marathi news

जंगल सफारी या पर्यटन क्षेत्रातील एका शाखेचा आता भारतात चांगलाच प्रसार होत आहे. जाणून घेऊया  प्रदीप सुतार, (वन्यजीव छायाचित्रकार) यांच्या अनुभवातून जंगल सफारी आणि भारतातील वाघाविषयी.......

जंगल सफारी करताना जंगल कसं पाहायचे घ्या जाणून

sakal_logo
By
प्रदीप सुतार

 सांगली : जंगल म्हटलं की समोर दिसतो तो वाघ. या निसर्गचक्राचा तो अधिष्ठाता आहे. वाघ म्हणजे सर्व सृष्टीचा जीवनदाता. जिथे वाघ राहतो तो भाग घनदाट जंगलांनी समृद्ध असतो. अशा या जंगलात हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरं सुरक्षित राहतात. म्हणजेच निसर्गाचा समतोल राहतो. इथं प्रत्येकाला भ्रमंती करायला आवडते. जंगलातील प्रत्येक पशु, पक्षी, कीटक या जीवांचे निरीक्षण ही एक स्वतंत्र शाखा आहे. म्हणजे जंगल सफारीच्या अशा नानाविध शाखा आहेत. जंगल सफारी या पर्यटन क्षेत्रातील एका शाखेचा आता भारतात चांगलाच प्रसार होत आहे. जाणून घेऊया  प्रदीप सुतार, (वन्यजीव छायाचित्रकार) यांच्या अनुभवातून जंगल सफारी आणि भारतातील वाघाविषयी.......

गेल्या दोन दशकांत मी भारतातील ८० टक्के जंगले पालथी घातली आहेत. छायाचित्रणाच्या निमित्ताने मला हे वेड लागले. त्यासाठी मी कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र, माझे या क्षेत्रातील अनेक वरिष्ठ, पर्यावरणप्रेमी यांनी बोट धरून मला तिथे नेले आणि जंगल कसं पाहायचे याचे धडे दिले. खरं तर शिकण्याची प्रक्रिया सतत सुरूच असते. प्रत्येकवेळा तो अनुभव नवा असतो. थोड्या चुका झाल्या तर शेवटचाही ठरू शकतो. त्यामुळे आपण प्राण्यांच्या हद्दीत आहोत याचे भान कदापि सुटता कामा नये. जंगलात वाघ दिसला तर जंगल सफारीचे सार्थक झालं असं म्हटलं जातं. खरं तर तसं समजण्याचं कारण नाही. जंगलातील जैवविविधता उघड्या डोळ्यांनी पहायची, तिथली शांतता अनुभवायची आणि ती उर्जा घेऊन माणसांच्या सिमेंटच्या जंगलात यायचे. दोन्हीकडीला तुलना आपणच मनोमन करायची आणि कोणतं जग..जंगल हवं हे ठरवायचं. 

वाघ बघायचा आहे

वाघ बघायचा तर संयम हवा. त्याच्या पाऊलखुणा, त्याने खोडांवर मारलेले पंजे, ओरखडे,  त्याची विष्टा, तो आला आहे याचे संकेत देणारी माकडे, गवे, रानकुत्री, सांबर, पक्षी ही सारी मंडळी तो येण्याआधीच अलर्ट देतात. हा सारा माहोल अनुभवणे म्हणजे जंगल सफारी आहे.  भारतात जगातले सत्तर टक्के वाघ आहेत यावरून आपल्या वाट्याला किती वैभव आहे हे समजून येईल. ही संख्या वाढवणे आणि जगाला आपल्याला अभिमानाने आमच्याकडे वाघ आहे असं सांगण्यासाठी आपल्याला यापुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील. सांगली जिल्ह्यात चांदोलीत वाघाचा वावर आहे. तो तिथं स्थिरावण्यासाठी...त्यांची पैदास होण्यासाठी आता नवे ‘एनटीसीए’ कडून लवकरच प्रकल्प हाती घेतला जातोय. आपल्याला सर्व ते पाठबळ त्यासाठी द्यायला हवे. हा शौक करायचा तर पैसे मोजायची तयारी हवी. मात्र हा खर्च तुमची जगण्याची श्रीमंती वाढवणारा आहे. त्यामुळे हे जंगलवेड जपलंच पाहिजे.  
  
आरक्षणाची व्यवस्था
जंगल सफारीला जाण्यापूर्वी व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव विभागाची ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये सुरू आहे. तेथे निवास व्यवस्थाही उपलब्ध असते. पूर्वनियोजनाने आरक्षण मिळू शकते. व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीची वेळ शक्‍यतो सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते ६ असते. यावेळी वन्यप्राण्यांचे दर्शन मिळणे सोयीचे होते. सफारी करत असताना गाईडच्या सोबत जाणे सक्तीचे असते. 

ऑनलाईन दर्शनही 
साधारण जानेवारीपासून व्याघ्र प्रकल्पांच्या सहलींचा हंगाम असतो. इंटरनेट मायाजालामुळे आता जगभरातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाच्या आरक्षणापासून सर्व काही माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. कोरोना काळात तर चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघोबांशी कनेक्‍ट राहण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने ww. mytadoba.org किंवा you tube द्वारे हजारो प्रेक्षकांना ताडोबा भ्रमंतीचा आनंद दिला होता. येत्या काही वर्षांत ऑनलाईन व्याघ्र दर्शनाचा ट्रेन्ड वाढणार आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन सफारी सुरू करणारा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या क्रुजर नॅशनल पार्क लाईव्ह स्ट्रीमिंग कार्यक्रमावरून ही कल्पना घेण्यात आली होती. 

 वाघांचं जीवन धोक्‍यात

भारतात १० व्या शतकाच्या प्रारंभी जवळपास एक लाख वाघ होते आणि जसजसे १९ वे शतक संपलं तशी त्यांची संख्या ४० हजारांवर आली. आता भारतीय वाघ नामशेष होतात की काय, अशी भीती निर्माण झाली. पुढे भारतीय वाघांचं जीवन धोक्‍यात आल्यावर भारत सरकारने १९७० मध्ये वाघांच्या शिकारीवर पूर्ण बंदी घातली. ही बंदी भारतीय वन्यजीवांच्या संरक्षणाचं महत्त्वाचं पाऊल ठरली. 

भारतात  व्याघ्र प्रकल्पांची स्थापना

भारतीय वाघांची प्रथमच १९७२ मध्ये गणना झाली. यात भारतात एक हजार वाघ आढळले. या वेळी वर्ल्ड वाईल्ड लाईफ फाउंडेशनने (WWF) पुढाकार घेतला. त्यासाठी जागतिक बॅंक व भारत सरकारने आर्थिक वाटा उचलला. १९७२ मध्ये खऱ्या अर्थाने व्याघ्र प्रकल्पाला सुरवात झाली. निसर्गप्रेमी पंतप्रधान इंदिरा गांधी या खंबीरपणे या योजनेच्या पाठीशी राहिल्या आणि वन्यजीव अधिनियम १९७२ चा कायदा अमलात आला. भारतात १९७३ मध्ये प्रथम नऊ व्याघ्र प्रकल्पांची स्थापना करण्यात आली. यात जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानाला (उत्तराखंड) व्याघ्र प्रकल्पाचा प्रथम मान मिळाला. नंतर बंदीपूर (कर्नाटक), कान्हा (मध्य प्रदेश), मानस (आसाम), मेळघाट (महाराष्ट्र), पलामू (बिहार), सिमलीपाल (ओरिसा), सुंदरबन (पश्‍चिम बंगाल) असे व्याघ्र प्रकल्प १९७३-७४ या वर्षात स्थापन झाले. आजअखेर ५० टायगर रिझर्व्ह, १०० राष्ट्रीय उद्याने, तर ५५३ अभयारण्ये घोषित झाली आहेत. अजूनही काही अभयारण्ये प्रस्तावित आहेत. 

 वन्यप्राण्यांना मिळाले  संरक्षण 

या कायद्यानंतर वन्यप्राण्यांना फार मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाले. वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती हे घटक खऱ्या अर्थाने संरक्षित झाले. आजघडीला भारतात जवळपास वाघांची संख्या तीन हजार आहे. जगाच्या तुलनेत ७० टक्के वाघ भारतात आहेत. यात सर्वांत जास्त मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तमिळनाडू, आसाम, केरळ, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी वाघांची संख्या अनुक्रमे जास्त आढळते. प्रत्येक जंगलाचे वेगळे वैशिष्ट्य असते. काही जंगले ही मानवनिर्मित, तर काही नैसर्गिक आहेत. यांतली काही जंगले वाघ, सिंह, हत्ती, अस्वल, गवे, बिबटे यांसाठीच प्रसिद्ध आहेत. काही पक्ष्यांसाठी, तर काही सापांसाठी प्रसिद्ध आहेत. या समृद्ध वन्यजीवन परंपरेचा आपल्याला अभिमान हवा. त्यांची जपणूक हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. 

नव्या पिढीचा ओढा वाढणे गरजेचे

जंगल सफारी या पर्यटन क्षेत्रातील एका शाखेचा आता भारतात चांगलाच प्रसार होत आहे. भारत सरकार आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रयत्नातून याविषयी चांगली जाणीव जागृती होत आहे. याकडे नव्या पिढीचा ओढा वाढणे गरजेचे आहे. कारण त्यातूनच पर्यावरण संरक्षण आणि त्याबद्दलचे प्रेम समाजात वाढीस लागेल. एकूण मानवी जीवनाची श्रीमंती वाढवणारी अशी ही पर्यटन क्षेत्राची शाखा आहे. 
- प्रदीप सुतार, वन्यजीव छायाचित्रकार

संपादन- अर्चना बनगे
 

loading image