माजी सभापती सुशांत देवकर यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

मी पक्ष सोडत आहे असे सांगत विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर यांनी आज पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला.

विटा : माझ्या आजवरच्या कारकिर्दीत राजकारणापेक्षा मी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. मला माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे शिवसेनेत काम करता येत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे असे सांगत विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर यांनी आज पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. त्यांनी पुढील राजकीय निर्णय कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून जाहीर करू असेही सांगितले. 

श्री देवकर शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे निकटचे कार्यकर्ते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी त्यांना सोबत केली आहे. सांगोले गावचे आदर्श सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. पंचायत समिती, बाजार समितीवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम करताना ठसा उमटवला आहे. आज त्यांनी बाबर यांच्यावर कोणतीही थेट टिका केली नाही. 

श्री देवकर म्हणाले, "गेली तीन - चार वर्षे शिवसेनेत काम केले. परंतु तिथे माझ्या कार्यपद्धतीनुसार काम करणे जमत नाही. आता लोकांमध्ये जाऊन माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेईन. मी शिवसेनेत कोणत्याही पदावर नाही. अथाव तिथून निवडूनही आलेलो नाही. माझी पत्नी कविता या पंचायत समिती सदस्या आहेत. त्यांना पाच वर्षासाठी लोकांनी निवडून दिले आहे. त्या यापुढेही शिवसेनेतच राहतील.'' 

यावेळी विश्वजीत देवकर, मधुकर बाबर, डॉ. शिवाजी गुजर, देविदास पवार, विजयकुमार बाबर, संजय निकम, प्रवीण बाबर, अनिलअण्णा बाबर, शशिकांत कुंभार, सिद्धनाथ बाबर, सचिन मोरे उपस्थित होते.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Former chairman Sushant Deokar left the Shivsena party