माजी सैनिकाची गांजाची शेती उद्‌ध्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सातारा - सोनगाव संमत निंब (ता. सातारा) येथील माजी सैनिक हणमंत लक्ष्मण शिंदे याच्या शेतातून काल रात्री शहर पोलिसांनी गांजाची सुमारे 120 झाडे जप्त केली, तसेच घराच्या छतावर वाळत ठेवलेला 12 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजाही जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या एकूण 32 किलो 600 ग्रॅम वजनाच्या गांजाची किंमत एक लाख 80 हजार रुपये आहे. 

सोनगाव संमत निंब (ता. सातारा) येथील एका शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती काल दुपारी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन छापा टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, श्री. पाटील, परिविक्षाधीन उपअधीक्षक भोसले यांनी सहायक फौजदार राजू शेख, हवालदार वसंत साबळे, संजय शिर्के, प्रवीण फडतरे, सोमनाथ शिंदे, नीलेश काटकर, नीलेश गायकवाड, संतोष इष्टे यांच्यासह छापा टाकला. 

पोलिसांनी गावातील पोकरन नावाच्या शिवारातील शेतात शोध मोहीम सुरू केली. या वेळी त्यांना माजी सैनिक हणमंत शिंदे याच्या भुईमुगाच्या शेतातील पट्टीत गांजाची अडीच ते तीन फूट उंचीची झाडे सापडली. या वेळी शिंदे हे गांजाच्या झाडांना पाणी देण्यासाठी पाट खोदत असताना पोलिसांना आढळले. त्याला ताब्यात घेण्यात आले, तसेच झाडे उपटण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्या दरम्यान शिंदे याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या घराच्या छतावर गांजाची झाडे आणि पाने वाळण्यासाठी ठेवली असल्याचे पोलिसांना समजले. तेथे जाऊन पोलिसांनी छतावर वाळत ठेवलेला गांजाही जप्त केला. पहाटे चारपर्यंत ही कारवाई सुरू होती. 

गांजाची लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून शहर पोलिसांनी त्याला अटक केले. याबाबत हवालदार प्रवीण फडतरे यांनी फिर्याद दिली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करत आहेत. 

Web Title: Former soldiers destroyed the hemp farming