"जलयुक्‍त'ची समृद्धी नव्या सरकारवर अवलंबून ! 

विनायक लांडे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

जलयुक्त अभियान 26 जानेवारी 2015 रोजी कार्यान्वित झाले. वर्षानुवर्षे ज्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू असतात, अशी गावे या योजनेत प्राधान्याने निवडण्यात येतात. मात्र, यानंतर यापुढे पुन्हा निवड केलेल्या गावांत कामे झाली नाहीत, तर टॅंकरमुक्तीचे स्वप्न सत्यात उतरणार नाही, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.

नगर : राज्य सरकारने 2014 मध्ये टॅंकरमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेसाठी जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित केली. गेल्या चार वर्षांत 1035 दुष्काळग्रस्त गावांत माथा ते पायथा, पाणी अडवा... पाणी जिरवा योजनांतून पाणलोटाची कामे झाली. यासाठी 581 कोटींचा खर्च झाला. मात्र, ज्या गावांत जलसंधारणाची कामे झाली, त्या ठिकाणी पुन्हा कामे केली नाहीत, तर पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती उद्‌भवू शकते. यंदा योजनेंतर्गत लाभार्थी गावांची निवडच झाली नाही. त्यातच राज्यात सरकारचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. 

तीन लाख 99 हजार 214 हेक्‍टर क्षेत्राला फायदा 
जिल्ह्यात चार वर्षांत जलयुक्तच्या माध्यमातून खोल समतल चर, माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण, गाळ काढणे, साठवण बंधारे व दुरुस्ती, वनतळ्यांची कामे शास्त्रोक्त पद्धतीने झाली. जमिनीचा पोत राखण्यासाठी तीन लाख 70 हजार 805 हेक्‍टर रानात ताली टाकण्यात आल्या. सर्व जलयुक्त कामांवर 581 कोटी खर्च झाले. त्यामुळे तीन लाख 99 हजार 214 हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होत असल्याचा दावा कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी केला. 

जलसंधारणाचे प्रयोग राबविण्याची गरज 
तूर, बाजरी, उडीद, ज्वारी, हरभरा आदी पिके जिरायत शिवारात घेतली जातात. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आधार असतो. जिरायत शिवार समृद्ध व आत्मनिर्भर करण्यासाठी जलसंधारणाशिवाय पर्याय नाही. पावसाचा प्रत्येक थेंब न्‌ थेंब जमिनीत जिरावा, घोटभर पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट थांबावी, हा प्रमुख उद्देश असलेल्या या योजनेचा उद्देश सफल होण्यासाठी पुन्हा जलसंधारणाचे प्रयोग राबविणे गरजेचे आहे. 

टॅंकरमुक्तीचे स्वप्न सत्यात कधी उतरणार 
जलयुक्त अभियान 26 जानेवारी 2015 रोजी कार्यान्वित झाले. वर्षानुवर्षे ज्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू असतात, अशी गावे या योजनेत प्राधान्याने निवडण्यात येतात. मात्र, यानंतर यापुढे पुन्हा निवड केलेल्या गावांत कामे झाली नाहीत, तर टॅंकरमुक्तीचे स्वप्न सत्यात उतरणार नाही, असे जलतज्ज्ञांचे मत आहे. 

दोन लाख टीसीएम पाणीसाठा अपेक्षित 
चार वर्षांत जलयुक्तसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातील 36 हजार 483 कामे पूर्ण झाली. त्यावर 581 कोटी 16 लाख रुपये खर्ची पडले. मोठ्या पावसानंतर जलयुक्तमध्ये झालेल्या कामातून एक लाख 99 हजार 607 टीसीएम पाणीसाठा निर्माण होणे अपेक्षित आहे. 

"जलयुक्त'चा लेखाजोखा 
वर्ष गावे कामे 
2015-16 279 14632 
2016-17 268 9694 
2017-18 241 7750 
2018-19 249 4407 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: formula of the "jal samrudhi" depends on the new government