उजनी धरणात चार डॉक्‍टर बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

इंदापूर/नातेपुते - आजोती (ता. इंदापूर) येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत चार डॉक्‍टर बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी पाच वाजता घडली. त्यापैकी एका डॉक्‍टरचा मृतदेह मिळाला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे. जीवरक्षक जॅकेट परिधान न करता होडीतून खोल पाण्यात गेलेल्या या डॉक्‍टरांवर काळाने घाला घातला. 

इंदापूर/नातेपुते - आजोती (ता. इंदापूर) येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत चार डॉक्‍टर बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी पाच वाजता घडली. त्यापैकी एका डॉक्‍टरचा मृतदेह मिळाला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे. जीवरक्षक जॅकेट परिधान न करता होडीतून खोल पाण्यात गेलेल्या या डॉक्‍टरांवर काळाने घाला घातला. 

या दुर्घटनेत डॉ. चंद्रकांत उराडे (रा. नातेपुते) यांचा मृतदेह मिळाला आहे. भूलतज्ज्ञ डॉ. सुभाष मांजरीकर, डॉ. अण्णासाहेब शिंदे (दोघेही रा. अकलूज), डॉ. महेश लवटे (रा. नातेपुते) हे डॉक्‍टर पाण्यात बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. अकलूज, नातेपुते व माळशिरस परिसरातील 10 डॉक्‍टर नौकानयनसाठी आले असताना ही दुर्घटना घडली. 

अकलूज येथील डॉ. सुभाष मांजरेकर, डॉ. अतुल दोशी, डॉ. श्रीकांत देवडीकर, डॉ. समीर दोशी, डॉ. दिलीप वाघमोडे, माळशिरसचे डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दत्तात्रय सर्जे तसेच नातेपुते येथील डॉ. महेश लवटे, डॉ. चंद्रकांत उराडे हे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील आजोती येथे नौकानयनसाठी गेले होते. होडी पाण्यात आतमध्ये उलटली. सर्व जण भीमा नदीत पडले. त्यातील डॉ. चंद्रकांत उराडे यांचा मृतदेह सापडला. डॉ. महेश लवटे, डॉ. सुभाष मांजरेकर, डॉ. अण्णासाहेब शिंदे हे पाण्यात बेपत्ता झाले. अन्य डॉक्‍टर नदी पोहून सुखरूप बाहेर आले. त्यांना मानसिक धक्का बसला आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे इंदापूर तालुकाध्यक्ष डॉ. समीर मगर, सचिव मिलिंद खाडे, डॉ. सागर दोशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींवर तातडीने प्रथमोपचार केले. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले आहे. उद्या (ता. 1 मे) सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली. 

बॅक वॉटरला दुर्घटना 
* दुपारी अकरा वाजता डॉक्‍टर उजनीच्या बॅकवॉटरला पर्यटनासाठी गेले 
* पाण्यात जाण्याआधी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला 
* इंदापूरजवळील आजोती गावच्या परिसरात नौकाविहाराला गेले 
* किनाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर नाव पाण्यात बुडाली 
* सात जणांनी पोहून अंतर पार केले, चौघे जण बुडाल्याचा अंदाज 
* सात डॉक्‍टर मच्छीमारांच्या साह्याने पाण्याबाहेर येण्यात यशस्वी 
* अंधार पडेपर्यंत शोधमोहीम, रात्री शोधमोहीम थांबवली 

हे शर्थीने बचावले 
या दुर्घटनेतील डॉ. दिलीप वाघमोडे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दत्तात्रय सर्जे (सर्वजण रा. माळशिरस), डॉ. विनोदकुमार दोशी, डॉ. श्रीकांत देवडीकर, डॉ. अतुल दोशी, डॉ. समीर दोशी (सर्वजण रा. अकलूज) हे सात जण पोहून बाहेर आले आहेत. 

सारे सुन्न 
नातेपुते येथे शोककळा पसरली आहे. येथील अश्‍विनी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. महेश लवटे, अतिशय शांत स्वभावाचे डॉ. चंद्रकांत उराडे यांच्याबाबत झालेल्या अपघाताने सारे सुन्न झाले आहेत. डॉ. लवटे हे माळशिरस तालुक्‍यासह सातारा व पुणे जिल्ह्यांत प्रसिद्ध सर्जन आहेत. त्यांचे सासरे सांगोला येथील प्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब रूपनर हे आहेत. डॉ. उराडे येथील माणिक उराडे यांचे धाकटे बंधू आहेत. तसेच डॉ. सुभाष मांजरेकर हे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ असून ते अकलूज येथील क्रिटीकेअर येथे कार्यरत होते. तसेच, डॉ. शिंदे हे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. 

नातेपुते शहरावर शोककळा 
नातेपुते - डॉ. चंद्रकांत उराडे व डॉ. महेश लवटे यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केल्यापासून पूर्णवेळ एकत्रच असत. त्यांचे निधनही एकत्र झाल्याने त्यांच्या अनोख्या मैत्रीची चर्चा सुरू आहे. डॉ. लवटे व डॉ. उराडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेपुते शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. शहरवासीयांनी डॉ. लवटे यांच्या अश्‍विनी हॉस्पिटलसमोर व डॉ. उराडे यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे. 

डॉ. लवटे सामान्य कुटुंबातून सर्जन झाले होते. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाने हजारो रुग्ण बरे झाले आहेत. पुणे-पंढरपूर रोडवर त्यांचे अश्‍विनी हॉस्पिटल असून शस्त्रक्रियेसाठी सातारा व पुणे जिल्ह्यात जात होते. गरिबांबद्दलची कळवळ व मनमोकळा स्वभाव, अतिशय माफक फी, अनेकदा मोफत सेवा यामुळे ते सर्वसामान्यांचे डॉक्‍टर झाले होते. या दोघांच्या निधनाचे वृत्त कोणालाही खरे वाटत नाहीये. प्रत्येकजण टीव्हीसमोर व एकमेकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून खात्री करीत होते. 

डॉ. उराडे यांच्या निवासस्थानी त्यांची पत्नी मनीषा, पुतण्या ओम यांच्या दुःखाला पारावर उरलेला नाही. डॉ. उराडे यांची सासुरवाडी येथील ठोंबरे परिवारातील असल्याने संपूर्ण गावातील चौकाचौकांत या घटनेची चर्चा सुरू आहे. त्यांच्या आझाद चौकात व मुख्यपेठेत लोकांनी चुली पेटविल्या नाहीत. डॉ. लवटे यांचा मृतदेह अजून हाती लागला नसल्याने ग्रामस्थांना ते जिवंत अथवा काहीतरी चमत्कार घडावा, अशी प्रार्थना देवाला करीत आहेत. 

अनेकांनी घेतली इंदापूरकडे धाव 
नातेपुते शहरात शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती. या घटनेचे वृत्त समजताच मिरवणूक थांबविण्यात आली. शहरात आज एक मोठा लग्न समारंभ सुरू होता. सातच्या सुमारास हे वृत्त समजताच अनेकांनी इंदापूरकडे धाव घेतली. डॉ. लवटे यांच्या मागे पत्नी, आई, दोन लहान मुले व एक बंधू असा परिवार आहे. मुलांचे वय चार व दोन वर्षे आहे. डॉ. उराडे यांच्या मागे पत्नी, भाऊ, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. 

Web Title: Four doctors lost in the Ujni dam