आष्ट्यात चार लाखांचे दागिने लंपास

आष्ट्यात चार लाखांचे दागिने लंपास

आष्टा - येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत हॅंडबॅगेतील १४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख १४०० रुपये ठेवलेली पर्स लांबवली. याबाबतची फिर्याद अश्‍विनी विश्‍वजित पवार (कऱ्हाड) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली. 

पोलिसांनी सांगितले, की विश्‍वजित व अश्‍विनी १५ फेब्रुवारीला नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी मर्दवाडी (ता. वाळवा) येथे आले होते. आज सकाळी अकराला अश्‍विनी, सासूबाई शारदा व मुलगा रमण मर्दवाडी येथून रिक्षाने आष्टा बसस्थानकात आले. अश्‍विनी यांनी सोन्याच्या चार बांगड्या, मंगळसूत्र, राणीहार, दोन पाटल्या व रोख रक्कम असे साहित्य लहान पर्समध्ये ठेवले व ती पर्स हॅंडबागेत ठेवली होती. शहरात काल बंद असल्याने आज बसस्थानकावर गर्दी होती.

दोघी सांगली-शिराळा गाडीत चढल्या. सासूबाईंनी तिकीट घेतले. बस बावची फाटा येथे आली असता शारदा यांना पर्समध्ये पैसे नसल्याचे लक्षात आले. अश्‍विनी यांनीही त्यांची पर्स पाहिली. त्यांचीही पर्स गायब होती. बावची फाटा येथे उतरून दोघी पुन्हा बसस्थानकावर आल्या. तेथे हॅंडबॅगेत टाकलेल्या दागिन्यांचीही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बसस्थानकात शोधाशोध केली; पण कोणताच धागादोरा मिळाला नाही.

बसस्थानकात चौथी घटना 
काही दिवसांपासून बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दोन-तीन महिन्यांत तीन महिलांच्या दागिन्यांची चोरी झाली. आज तब्बल १४ तोळे दागिने लांबविण्यात आले. बसमध्ये चढताना चोरी होते, टोळके सक्रिय राहते याचे गांभीर्य ना बसस्थानक प्रशासनाला, ना पोलिसांना आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com