बेळंकीत आणखी चौघेजण पॉझिटिव्ह; इतके दिवस राहणार व्यवहार बंद

अनिल पाटील 
Tuesday, 14 July 2020

55 वर्षीय महिला आणि 65 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी चौघे पॉझिटिव्ह आढळून आले

सलगरे (जि . सांगली) : 55 वर्षीय महिला आणि 65 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी चौघे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुंबईहून आलेले जावई आणि 13 वर्षांची एक मुलगी आणि 12 वर्षांची दोन मुले यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने बेळंकीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 6 झाली आहे.

या व्यक्तींच्या संपर्कात मालगाव येथील चार जण कोरोना पॉंझिटीव्ह झाले आहेत. यामुळे बेळंकी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने खबरदारी म्हणून आजपासून (ता. 13) ते शनिवारपर्यंत (ता. 18) दवाखाना, मेडिकल, बॅंका व दूध डेअरी सोडून इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यातत आले आहे. 

बेळंकीत मुंबई कनेक्‍शन मुळे रुग्णांची संख्या वाढत असून, आता धार्मिक कार्यक्रमात जेवण केलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. कोरोना बाधीत महिला या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होत्या. मुंबईहून आलेल्या बेळंकी (ता. मिरज) येथील कोरोना बाधीतांनी मालगाव येथील पाहुण्यांकडे मुक्काम केल्याने मालगावमधील चौघेजण कोरोना पॉंझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. 

बेळंकी, मालगावसह परिसरातील शिंदेवाडी, संबर्गी, खिळेगाव, कवठेमहांकाळ, कोकळे आदी ठिकाणी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात पाच ते दहा दिवस संपूर्ण व्यवहार बंद केल्याने तेथील नागरिकांनी शेतीला लागणारी खते, किराणा, भाजीपाला व औषधे खरेदीसाठी जवळपास असणाऱ्या सलगरे बाजारपेठेत धाव घेतली आहे.

यामुळे खबरदारी म्हणून बुधवार व गुरुवार दोन दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळून बंद करायचा निर्णय व्यापारी व आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांना 50 रुपये दंड आणि दुकानदारांना 200 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सरपंच तानाजीराव पाटील यांनी सांगितले.  

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four more corona positive in Belanki villege; The transaction will be closed for so many days