पावसामुळे नेवाशात घर कोसळून चौघांचा मृत्यू: एक जखमी जखमी

सुनील गर्जे 
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

या दुर्घटनेत  जाफरखान पठाण (वय ६२), उसामा खान पठाण (वय १८), नर्गिस शहजादेखान पठाण (वय ३०), बेबी रहतुल्ला खान पठाण (वय ६०, सर्व राहणार नेवासे) यांचा जागीच मृत्यू झाला. यात अरमान पठाण (वय : 15) हा गंभीर जखमी झाला आहे. 

नेवासे : नेवासे तालुक्यात आज सायंकाळी व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नेवासे शहरातील  70 ते 80 वर्षाच्या जुन्या पठाण वाड्यातील लाकडी धाब्याच्या घराचे छत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. एक पंधरावर्षीय तरुण यात जबर जखमी झाला. ही घटना बुधवारी (ता. २३) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. 

या दुर्घटनेत  जाफरखान पठाण (वय ६२), उसामा खान पठाण (वय १८), नर्गिस शहजादेखान पठाण (वय ३०), बेबी रहतुल्ला खान पठाण (वय ६०, सर्व राहणार नेवासे) यांचा जागीच मृत्यू झाला. यात अरमान पठाण (वय : 15) हा गंभीर जखमी झाला आहे. 

नेवासे येथे बुधवारी सायंकाळी व रात्री झालेल्या  पावसाने पठाण यांच्या लाकडी खणाच्या जुन्या वाड्यातील एका खोलीचे छत कोसळले.  त्यात मातीखाली दबून या चौघांचा मृत्यू झाला. ही घटना घडताच नागरिकांनी पठाण वाड्याकडे धाव घेतली. छताखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. दबलेल्या पाच जणांना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यातील जखमी अरमान पठाण याला नेवासेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दरम्यान या दुर्घटनेमुळे नेवासे शहरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासेफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. मृतावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four people killed in home collapsed for heavy rain in Newasa