काँग्रेसमध्ये अध्यक्षांच्या जोडीला चार कार्याध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी सुरु
दोन्ही 'प्रकाशां'चे आसन स्थिर 

सोलापूर- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस समितीने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या मदतीसाठी प्रत्येकी दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सोलापूर शहरासाठी माजी महापौर संजय हेमगड्डी आणि अरुण शर्मा यांची तर जिल्ह्यासाठी अश्पाक बळोरगी व शिवलिंग सुकळे हे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याबाबत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उद्या (रविवारी) सोलापुरात स्पष्ट करतील, असे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सकाळला सांगितले. या चौघांची नियुक्ती केलेले प्रदेशाध्य़क्ष अशोक चव्हाण यांचे पत्र आज (शनिवारी) दुपारी मिळाल्याचेही ते म्हणाले. 

गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सपशेल अपयश आल्यामुळे शहर व जिल्हा कांग्रेसला मरगळ आली होती. त्यातच महापालिकेच्या निवडणुकीतही सपाटून
पराभव झाल्याने सोलापुरातील कांग्रेस संपते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे व आमदार भारत भालके
यांनी छोट्या-छोट्या आंदोलनाच्या माध्यमातून कांग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले. स्थानिक कार्यकर्त्यांची आंदोलने मात्र कार्यालयापुरतीच मर्यादित राहीली होती, मात्र
आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या संवाद मेळाव्यामुळे कांग्रेसमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झाले आणि संघटनात्मक बांधणीला गती आली.

आता अध्यक्षाच्या जोडीला दोन-दोन कार्याध्यक्ष असल्याने संघटनात्मक बांधणी जोमाने करण्याची संधी कांग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मिळणार आहे. कार्याध्यक्ष नियुक्ती करून जो हेतू साध्य करण्याचे नियोजन कांग्रेसने केले आहे, ते साध्य होते की नाही हे येणारा काळच ठरविणार आहे.

दोन्ही 'प्रकाशां'चे आसन स्थिर 
शहर व जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती झाल्याने विद्यमान शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे आसन स्थिर झाल्याचे मानले जात आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांचीही उचलबांगडी होण्याची चर्चा होती, मात्र तूर्त लोकसभा निवडणुकीपर्यंत दोन्ही विद्यमान अध्यक्ष कायम राहतील, असे सांगितले जात आहे.

Web Title: Four Working President with President In Congress