चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सातारा - विविध प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आजपासून जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सातारा - विविध प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आजपासून जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

चतुर्थश्रेणी संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरती करावीत, तंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार वेतन द्यावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १२/२४ वर्षांच्या आश्‍वासित प्रगती योजनेच्या लाभाचा फरक मिळावा, शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका व्हाव्यात, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तकात नोंद घेणे, भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदी पूर्ण करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा वेळेत मिळाव्यात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून शासकीय निवासस्थाने रिक्त करून कार्यरत कर्मचाऱ्यांना द्यावीत, पदोन्नती मिळावी, सुरक्षा रक्षकांना वेळेत वेतन मिळावे, अस्थायी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, कायाकल्प योजनेतून मिळालेल्या बक्षीस रकमेपैकी कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम मिळावी या मागण्यांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून वेळावेळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आरोग्य उपसंचालकांकडूनही या मागण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सात फेब्रुवारी रोजी आंदोलन सुरू केले होते. परंतु, जिल्हा शल्यचिकित्सकांनी मागण्यांच्या पूर्ततेचे आश्‍वासन दिल्याने ते स्थगित केले होते. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांनी आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे.

आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत दररोज सकाळी दहा ते पाच या कालावधीत हे आंदोलन सुरू राहील.
- सुरेखा चव्हाण, अध्यक्षा, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना

Web Title: fourth class employee agitation