जयसिंगपुरात रेबीजचा चौथा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

जयसिंगपूर  - दोन तरुण आणि महिलेच्या मृत्यूनंतर शहरात रेबीजचा चौथा बळी गेला. सुरेश जिनगोंडा पाटील (वय ५५, रा. सहावी गल्ली, मादनाईक मळा, जयसिंगपूर) यांचा रेबीजमुळे मृत्यू झाला. शहरात भटक्‍या कुत्र्यांमुळे नागरिक असुरक्षित असताना पालिका प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.

जयसिंगपूर  - दोन तरुण आणि महिलेच्या मृत्यूनंतर शहरात रेबीजचा चौथा बळी गेला. सुरेश जिनगोंडा पाटील (वय ५५, रा. सहावी गल्ली, मादनाईक मळा, जयसिंगपूर) यांचा रेबीजमुळे मृत्यू झाला. शहरात भटक्‍या कुत्र्यांमुळे नागरिक असुरक्षित असताना पालिका प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.

उमर सय्यद, कोंडाबाई बाबासाहेब बारुदवाले (दोघेही रा. राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) व संकेत नांदणे (रा. जयप्रकाश सोसायटी, धरणगुत्ती) या तिघांचा याआधी रेबीजने मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ सुरेश पाटील यांचाही रेबीजने बळी गेल्यानंतर शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महिला स्वच्छता कामगारावर हल्ला
सोमवारी सकाळी शहरात स्वच्छता करताना भटक्‍या कुत्र्यांनी ठेकेदाराच्या महिला कामगाराच्या पायाचा लचका तोडला. बस स्थानकालगत महावितरणच्या कार्यालयानजीक हा प्रकार घडला. 

सुरेश पाटील यांना १९ नोव्हेंबर रोजी भटक्‍या कुत्र्याने चावा घेतला होता. सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाचपैकी शेवटची लस आज (सोमवारी) दिली जाणार होती. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

सुरेश पाटील यांच्या कुटुंबातील १५ जणांना प्रतिबंधक लस दिली आहे. शिवाय, मादनाईक मळ्यातील त्यांच्या घराच्या परिसरात पाहणी करण्यात आली आहे. मात्र, रेबीजचा रुग्ण आढळला नाही. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. 
- डॉ. एन. एस. चौगुले, 

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जयसिंगपूर

शहरातील विकास कॉलनीसह परिसरात भटक्‍या कुत्र्यांनी चार दिवसंत दहा ते बारा जणांना चावा घेतला होता. यात शाळकरी विद्यार्थिनीही गंभीर जखमी झाली होती. 

भटक्‍या कुत्र्यांच्या उपद्रवानंतर पालिकेत काही संघटनांनी याबाबत प्रशासनाला जाबही विचारला होता. यानंतर काही दिवस भटकी कुत्री पकडून त्यांना जंगली भागात सोडण्यात येत होते. मात्र, यावर आक्षेप आल्यानंतर पालिका प्रशासनाने मोहीम थांबवली होती. निर्बिजीकरणावरही पालिकेच्या सभेत चर्चा झाली. मात्र, यासाठी खर्च अधिक असल्याने चर्चा पुढे सरकली नाही. भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात चौघांचा बळी गेल्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: fourth victim of Rabies in Jaysingpur