वयाच्या चौथ्या वर्षांत तीन जागतिक विक्रम करणारा "वंडरबॉय' 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

अतिशय लहान वयात तन्वीरने मिळवलेल्या यशाचे खूप कौतुक वाटते. भविष्यात तो अनेक विक्रम करीत आपल्या देशाचे नाव मोठे करील याचा आत्मविश्‍वास आहे. 
- सरिता उराडे-पात्रो, आई 

सोलापूर : कुणालाही विश्‍वास बसणार नाही असे तीन जागतिक रेकॉर्ड एका केवळ चार वर्षे वयाच्या बालकाने आपल्या नावावर केले आहेत. विलक्षण, असामान्य अशी त्या बालकाचे बुद्धी असून त्याचे नाव आहे तन्वीर नलिनीकांत पात्रो. 

तन्वीरचा जन्म एक ऑक्‍टोबर 2015 रोजी झाला. त्याचे वडील नलिनीकांत पात्रो हे ओरिसाचे असून ते सध्या तन्वीरला मार्गदर्शन करतात. ते नेव्हीत कार्यरत होते. त्यामुळे सहा-सहा महिने त्यांना घरी यायला जमायचे नाही. त्यामुळे तन्वीरला सांभाळण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. तन्वीरची आई सरिता उराडे-पात्रो या औषधनिर्माण अधिकारी असून त्या जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर येथे कार्यरत आहेत. तन्वीरचे लहान वयापासूनच इंग्रजी, मराठी, ओडिआ, हिंदी या भाषेवर प्रभुत्व आहे. तन्वीरला 17 नोव्हेंबर 2018 रोजी ओम फाउंडेशनने सोलापूर टॅलेंट ऍवॉर्डने सन्मानित केले. 27 डिसेंबर 2018 रोजी वंडर बुक ऑफ रेकॉर्डस इंटरनॅशनल अमेझिंग वंडर किड म्हणून किताब मिळाला. 28 डिसेंबर 2018 रोजी इन्क्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याने जागतिक विक्रम केला, मार्च 2019 मध्ये जीनियस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मेस्मेरायजिंग मेमरी किड हा किताब मिळवला आहे. 

 

जागतिक विक्रम करणारा "वंडरबॉय' (व्हिडीअो)

तन्वीरला जगातील 120 प्रमुख पुस्तकांच्या लेखकांची नावे तोंडपाठ आहेत. जगातील 250 शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी लावलेले शोध यांची माहिती आहे. सुमारे 205 देशांच्या राजधान्या त्याला पाठ आहेत, भारताच्या 28 राज्ये तसेच नऊ केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्याही त्याला माहिती आहेत, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे तो सांगू शकतो, जगातील 75 देशांचे ध्वज तो पाहून सांगू शकतो, भगवद्‌गीतेच्या 18 अध्यायांची नावेही त्याने पाठ केली आहेत. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आहे. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the fourth year of age, the three world record "Wonderboy"