अधिकाऱ्यांशी घरचे संबंध आहेत, 3 महिन्यांत नोकरी लावते!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सोलापूर  : रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील तरुणाची 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सुषमा डेव्हिड फर्नांडो (रा. श्रीफळ निवास, ओंकार सोसायटी, गुलाबनगर, मजरेवाडी, सोलापूर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. 

तातेराव गोविंदराव चोले (वय 24, रा. धोत्रेकर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तातेराव चोले यांच्या ओळखीची महिला कल्पना वैनुर यांच्या माध्यमातून सुषमा फर्नांडो हिची भेट झाली. फर्नांडो हिने रेल्वे खात्यात चांगली ओळख असल्याचे सांगून नोकरीचे आमिष दाखविले. रेल्वेत नोकरी पाहिजे असेल तर चार लाख रुपये द्या, तुम्हाला माझ्या ओळखीने तीन महिन्यांत रेल्वे कोठेही नोकरी लावते. हुबळी विभागात माझा नवरा कामाला आहे, हुबळी विभागीय अधिकाऱ्यांशी आमचे घरचे संबंध आहेत, असे सांगितले.

तुमच्या कामाकरिता मी हुबळीला व मुंबईतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. विश्‍वास संपादन करून 60 हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर नोकरीबाबत विचारणा केली असता टाळाटाळ केली. अधिकाऱ्यांची बदली झाली आहे, दोन ते तीन महिने थांबावे लागतील. तुमचे काम होईल, असे खोटे सांगितले. सहा महिन्यांनी परत विचारणा केली असता रेल्वेमंत्री बदलला आहे, असे खोटे सांगून टाळाटाळ केली. नोकरीबाबत शंका आल्याने चोले यांनी तिच्या घरी जाऊन पैसे परत मागितले. पैसे परत देण्याचे मान्य करूनही टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Fraud of 60 thousand rupees