
शेतकऱ्यांची साडेसात लाखांची फसवणूक
इस्लामपूर - रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील तीन द्राक्ष बागायतदारांची ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जमीर नजीर मुजावर व नजीर मेहबूब मुजावर (दोघेही रा. वाळवा) यांच्यावर इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत राहुल रघुनाथ माळी (वय ३४, रा. रेठरेहरणाक्ष) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ११ मार्च २०२२ रोजी जमीर मुजावर, नजीर मुजावर व नीलम थोरात हे रेठरे हरणाक्ष येथील द्राक्ष बागायतदार राहुल माळी, प्रवीण ज्ञानदेव माळी, स्वप्निल आनंदराव माळी यांच्या द्राक्षबागेत द्राक्ष खरेदी करण्यासाठी गेले होते. राहुल माळी यांची २ लाख, प्रवीण माळी यांची ३ लाख, स्वप्निल माळी यांची २ लाख ५० हजार रुपयांना शेतातील द्राक्ष उक्तीने खरेदी करतो, असे सांगून निघून गेले. १२ ते १७ मार्च या कालावधीत मुजावर यांनी तिघांचा माल तोडून नेला. त्यावर माळी कुटुंबीयांनी मुजावर यांच्याकडे पैशांची मागणी केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने व्यापाऱ्याने सोमवारी आमच्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर तुम्हांला पैसे देतो, असे सांगितले. परंतु माळी यांनी पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही, असे मुजावरला सांगितले. त्यानंतर मुजावर यांनी राहुल माळी यांना हणमंत माळी यांच्या नावे १ लाख २५ हजारांचा धनादेश दिला व रोख ७५ हजार रुपये देतो, असे सांगितले.
प्रवीण माळी यांनाही हणमंत माळी यांचे नावे २ लाख ३५ हजारांचा धनादेश दिला व ६५ हजार रोख देतो, सांगितले.स्वप्निल माळी यांना त्यांच्या नावे १ लाख ७० हजारांचा धनादेश दिला. रोख ८० हजार रुपये देतो असे सांगितले. तीन-चार दिवसांनी धनादेश बँकेत भरा, असे सांगून निघून गेले. त्यानंतर माळी हे धनादेश घेऊन बँकेत गेले असता मुजावर यांच्या खात्यात पैसे नसल्याचे समजले. मुजावर यांना फोन केला असता त्यांनी, ‘तुमचे पैसे देणार नाही, काय करायचे ते करा,’ अशी धमकी दिली. मुजावर यांना वारंवार पैशांची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे माळी यांना फसवणूक झाल्याची खात्री झाली. या घटनेची इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Fraud Of Rs 75 Lakh To 3 Vineyards Farmers Of Rethreharanaksha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..