डाळिंबाचा ट्रकच पळवला: कुठली घटना आहे वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

शेतकऱ्यांकडून गोळा केलेला 23 टन 828 किलो भगवा डाळिंब भरलेला मालट्रक चालकाने संबंधित ठिकाणी न पोचविता लंपास केला. यात व्यापाऱ्यांची 21 लाख 500 अधिक चालकास डिझेलकरिता दिलेले 83 हजार 286 असे 21 लाख 83 हजार 786 रुपयांची फसवणूक केली.

सांगोला : शेतकऱ्यांकडून गोळा केलेला 23 टन 828 किलो भगवा डाळिंब भरलेला मालट्रक चालकाने संबंधित ठिकाणी न पोचविता लंपास केला. यात व्यापाऱ्यांची 21 लाख 500 अधिक चालकास डिझेलकरिता दिलेले 83 हजार 286 असे 21 लाख 83 हजार 786 रुपयांची फसवणूक केली. ही घटना सांगोल्यात घडली. याप्रकरणी ट्रकचालक धर्मेंद्र जैयस्वार (रा. बहेरी रोड, बरेली, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : साथ सोडली... ज्यांच्यासाठी केला अट्टाहास त्यांनीच फिरवली पाठ
कशी घडली घटना...

शशिकांत विठ्ठल येलपले (रा. यमगर मंगेवाडी, ता. सांगोला) हे अनेक वर्षांपासून सांगोल्यात शेतकऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून ट्रान्सपोर्ट करीत आहेत. 25 डिसेंबरला शशिकांत येलपले यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या ज्ञानराज कृषी ट्रान्सपोर्टमधून (डब्लूबी 11 डी 9373) क्रमांकाच्या ट्रकमधून 21 लाख 500 रुपयांचे 23 हजार 828 किलो डाळिंब 1036 क्रेटमधून महम्मद कलिमउद्दीन (रा. पश्‍चिम बंगाल) यांच्याकडे घेऊन जाण्यास चालक धर्मेंद्र जैयस्वार (रा. बहेरी रोड, बरेली, उत्तर प्रदेश) यास पाठवले होते. डाळिंबाचा ट्रक घेऊन जाताना धर्मेंद्र जैयस्वार यास डिझेलसाठी 83 हजार 286 रुपये दिले होते. पैसे देताना रामचंद्र गुरव व समाधान डुकरे हजर होते. या वेळी ट्रक चालकाने मेहंदीपूर मालदा (पश्‍चिम बंगाल) येथे डाळिंब घेऊन जातो असे सांगितले. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आता हे गाव चर्चेत
२१ लाख ५०० रुपयांच्या डाळिंबाचा ट्रक

त्यानंतर पश्‍चिम बंगालमधील व्यापारी महम्मद कलिमउद्दीन यांनी येलपले यांना फोनद्वारे तुम्ही पाठवलेला माल मिळाला नसल्याचे सांगितले. ट्रकचालक धर्मेंद्र जैयस्वार याच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होत नव्हता. संबंधित ठिकाणी डाळिंब पोच झाले नसल्याने ट्रक चालकाने फसवणूक करून सदरचा माल परस्पर विकल्याची खात्री येलपले यांना झाली. 
याप्रकरणी शशिकांत येलपले यांनी 21 लाख 500 रुपयांच्या डाळिंबाचा ट्रक व डिझेलसाठी दिलेले 83 हजार 286 रुपये असे एकूण 21 लाख 83 हजार 786 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रक चालक धर्मेंद्र जैयस्वार याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of pomegranate growers in Sangola