तरूणांनो नोकरीसाठी चुकूनही हे करू नका

fraud by Youth in sangli
fraud by Youth in sangli

इस्लामपूर : शासकीय अभियंता म्हणून नोकरीस लावतो, असे सांगून १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार इस्लामपूर पोलिसांत दाखल झाली. याप्रकरणी रामचंद्र सुतार (रा. शिगाव ता. वाळवा) याच्या विरोधात गणेश रंगराव डवरी (वय ३०, रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. सुतार हा सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग पलूस येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. नोकरीबाबत जाब विचारला असता शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, डवरी हे सिव्हिल इंजिनियर पदवीधर आहेत. त्यांचे वडील बांधकाम विभागात कारकून म्हणून २००९ मध्ये रत्नागिरी येथून निवृत्त झाले आहेत. तेव्हापासून रामचंद्र हा देखील नोकरीस होता. त्यामुळे त्याची व डवरी कुटुंबाची चांगली ओळख होती. सन २०१६ ला रामचंद्र सुतारने ‘शासनदरबारी ओळख आहे. तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लावतो; परंतु तुम्हाला १५ ते १६ लाख रुपये द्यावे लागतील,’’ असे सांगितले. आर्थिक परिस्थिती नाही, एवढे पैसे जमणार नाहीत, असे सांगूनही सुतारने तुमच्या मुलाला कायमस्वरुपी बांधकाम विभागात सरकारी नोकरी लावतो त्यासाठी पैसे द्यावे लागणार, असा सतत पाठपुरावा केला.

गणेशच्या वडिलांनी निढोरी (ता. कागल) येथील शेतजमीन विकून बहिणीच्या लग्नाला पैसे ठेवले होते. ते पैसे तुझ्या नोकरीसाठी वापरू व तुला नोकरी लागली की नोकरीच्या पैश्‍यातून बहिणीचे लग्न कर, असे सांगून जमिन व घरातील दागिने विकले. त्यातून आलेले सोळा लाख रुपये सुतारला ऑगस्ट २०१६ च्या तिस-या आठवड्यात इस्लामपूर येथील एका हॉटेलसमोर दिली होती. त्यावेळी सुतारने सरकारी नोकरी पक्की झाली, असे सांगितले. त्यावेळी सुतार हा इस्लामपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक होता. त्यानंतर सुतार हा डवरी यांना इस्लामपूर येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात घेवून जात होता. त्या ठिकाणी दिवसभर बसवून ठेवत होता. त्यानंतर गणेश व त्यांच्या वडिलांनी सुतारकडे नोकरीच्या ऑर्डरबाबत तगादा लावला. त्यानंतर दोन महिन्याने त्याने वडिलांना फोन करुन तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लागली आहे, त्याची ऑर्डर मी मंत्रालयातून आणली आहे. तुमचा मुलगा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूर येथे रुजू होणार आहे, आणि मीही याच विभागात असल्याचे सांगितले. त्यानंतर सुतारने २१ नोव्हेंबर २०१६ ला उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इस्लामपूर येथे बोलावले व मला सार्वजनिक बाधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी नियुक्ती झालेले अधिक्षक अभियंता सावजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर यांच्या स्वाक्षरीचा पदनियुक्तीचा आदेश व पगाराचा दाखला व डिसेंबर २०१७ मधील ऑनलाईल सॅलरी स्लीप दिली. महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्रही दिले. त्यामुळे गणेश यांचा सुतारवर विश्‍वास बसला. त्यावेळी सुतारने तू माझा सहाय्यक आहेस, असे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागात त्याच्या टेबलसमोर बसवत होता. 

दरम्यान, या नोकरीच्या आधारे लग्नही झाले. नोकरीस आहे असे समजून कामावर जात होते, परंतु इतर कर्मचारी व अधिकाऱ्याप्रमाणे मस्टरमध्ये नाव नव्हते तसेच सॅलरी रिसीटर सही नव्हती. बॅंकेत खाते नाही, सेवा पुस्तक असे काहीच नव्हते. तसेच सुतार हा मला कार्यालयात थांबू देत नसल्याने संशय आला. त्यावेळी चौकशी केली असता सुतारने नोकरी लागल्याबाबत बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्याचे खोटे नियुक्तीपत्र तयार करून, खोटे पगाराचे दाखले, ओळखपत्र तसेच त्याचे इमेल आयडीवरुन बनावट पगाराचा दाखला व महाराष्ट्र शासनाच्या नावाचे बनावट शिक्के तयार करुन नोकरी लागल्याचे भासवत शासनाच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून शासनाचीही फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

दीड वर्ष प्रकार
गणेश दररोज सार्वजनिक बांधकाम विभाग इस्लामपूर येथे नोकरीस जाऊ लागले. सुतार हा दररोज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साईटवर म्हणजेच शासकीय रस्त्याचे पुलाचे बांधकाम व शासकीय इमारतीचे बांधकाम आदी ठिकाणी पाठवत असे. कार्यालयात थांबू देत नव्हता; परंतु तो दर महिन्याला १५ हजार रुपये पगार देत होता. पगार ईमेल आयडीवरुन पाठवित होता. त्याच्यावर ३० हजार रुपये पगार दाखवून बाकीची रक्कम १५ हजार शासनाकडे फंडापोटी जमा होत असल्याचे सांगत होता. सुतारने त्याची दुचाकी वापरण्यास दिली होती. हा प्रकार सुमारे दीड वर्ष चालला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com