राधानगरी धरणाचे स्वयंचिलत दरवाजे म्हणजे काय ? जाणून घ्या (व्हिडिओ)

राधानगरी धरणाचे स्वयंचिलत दरवाजे म्हणजे काय ? जाणून घ्या (व्हिडिओ)

कोल्हापूर - राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज उघडतील, उद्या उघडतील... अशी उत्सुकता कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे. हे दरवाजे उघडले की वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटल्याचे संकेत कोल्हापूरकरांना मिळतात. धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले, की पहिल्या टप्प्यात पुरेसा पाऊस झाला, असे मानले जाते. त्यामुळे धरण भरत आले की हे दरवाजे उघडतात कधी, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले असते.

हे सात दरवाजे म्हणजे राधानगरी धरणाचे एक वेगळे वैशिष्ट्य बनून आहे. भारतरत्न एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी या दरवाजाची रचना केली. धरण भरले की पाण्याचा दाब या दरवाजावर पडतो. दरवाजा आपोआप उचलला जातो. पाठोपाठ पाण्याचा विसर्ग सुरू होतो आणि धरणावरचा पाण्याचा अतिरिक्त दाब कमी होतो, अशी या स्वयंचलित दरवाजाची रचना आहे. 

राधानगरी धरण म्हणजे कोल्हापूरच्या हिरव्यागार शेतीचे गमक आहे. हे धरण राजर्षी शाहू महाराजांनी बांधले नसते तर पाऊस जसा पडला असता तसा वाहून गेला असता आणि जिल्ह्याच्या पाचवीला दुष्काळ पुजला असता. पण, शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून 1902 मध्ये या धरणाची भोगावती नदीवर फेजिवडे येथे उभारणी सुरू झाली. असंख्य अडचणींना तोंड देत 1952 च्या आसपास धरणाची उभारणी पूर्ण झाली आणि पिण्याच्या, पिकासाठीच्या पाण्याची त्या वेळच्या परिस्थितीत चिंता मिटली. 

या धरणाचे बांधकाम रेंगाळत झाले असले तरीही धरणाच्या पायात शिसे ओतून पाया भक्कम करण्यात आला. धरणाचे काम दर्जेदार व्हावे म्हणून खूप कसोट्या लावण्यात आल्या. शाहू महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी धरणाचे काम पूर्णत्वास नेले. दाजीराव अमृतराव विचारे यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. आणि त्यांचे नाव या परिसरातील एका वाडीस दाजीपूर असे देण्यात आले. 

या धरणात साडेसात टीएमसी इतका पाणीसाठा होतो. धरणास मुख्य भिंतीत पाच दरवाजे आहेत. ते क्रेनने उघडता येतात, बंद करता येतात. त्यातून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले जाते; पण धरण पूर्ण भरल्यावर धरणाच्या उत्तर बाजूस असलेल्या सात स्वयंचलित लोखंडी दरवाजावर आतल्या बाजूने पाण्याचा दाब पडतो. जसजसा दाब वाढत जाईल तसतसा एक एक लोखंडी दरवाजा वर उचलला जातो व त्या रिकाम्या झालेल्या जागेतून पाण्याचा लोंढा बाहेर पडू लागतो.

एक-एक करीत सातही दरवाजे उघडतात आणि फेसाळलेल्या दुधासारखे पाणी अजस्त्र लोटाच्या स्वरूपात बाहेर पडते आणि "दरवाजे उघडले, दरवाजे उघडले' ही वार्ता राधानगरीतून कोल्हापूरपर्यंत पाहता-पाहता पोचते. हे पाणी बाहेर पडले की भोगावती व पुढे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होते आणि पुन्हा एकदा भोगावती, पंचगंगा, कृष्णा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण होते. काठावरच्या गावातील लोकांना दवंडी देऊन सावध केले जाते. या स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर पडूनही धरण क्षेत्रात पाऊस सुरू राहिला व धरणातील पाण्याचा दाब वाढला तर मात्र भिंतीत असलेले दरवाजे क्रेनने वर उचलले जातात व धरणावरील पाण्याचा दाब कमी करतात. 

दरवाजांना सिमेंटचे ब्लॉक
वरवर हे सात दरवाजे पाण्याच्या दाबाने उघडतात असे वाचत असले तरी त्यामागे एम. विश्‍वेश्‍वरय्या यांचे एक तंत्र आहे. या सात दरवाजांना प्रत्येकी 70 टन वजनाचे सिमेंटचे ब्लॉक बांधले आहेत. ते पाण्यात आहेत. पाण्याचा दाब कमी झाला की हे 70 टन वजनाचे ब्लॉक दरवाजांना पुन्हा मूळ जागी आणतात. या दरवाजाची तेल-पाणी घालून नियमित देखभाल ठेवली जाते. अशा स्वरूपाचे दरवाजे भारघर धरणाला आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com