निधी पोलिसांचा आणि कल्याण...?

सुधाकर काशीद
मंगळवार, 18 एप्रिल 2017

निधी गोळा करायला पोलिसच वैतागले

निधी गोळा करायला पोलिसच वैतागले
कोल्हापूर  - पोलिस कल्याण निधी गोळा करण्यासाठी उद्दिष्ट ठरले आहे. "उद्दिष्टपूर्तीसाठी' धावपळ सुरू आहे. निधीत आपले पोलिस ठाणे मागे पडायला नको म्हणून खालपासून वरपर्यंत सर्वांना कामाला लावले गेले आहे. शिस्त म्हणजे शिस्त असे म्हणत प्रत्येक पोलिस पावत्या फाडत आहेत; पण सगळ्या गावाची बोलणी टीकाटिप्पणी सहन करत गोळा करणाऱ्या या निधीतून सर्वसामान्य पोलिसांचे कल्याण किती झाले याच प्रश्‍नाचा पिंगा सध्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलिसांसमोर आहे.

खात्यातील शिस्तीच्या बडग्यामुळे या स्थितीबद्दल पोलिसांना तोंड उघडायची चोरी आहे. पण वर्षानुवर्षे पोलिसांनी गावभर फिरून निधी गोळा करायचा आणि ठराविकांच्या कल्याणासाठीच तो खर्च करायचा हे आता बदललेच पाहिजे ही प्रत्येक पोलिसांच्या मनातली भावना आहे.
या वर्षी 1 मे रोजी पोलिस कल्याण निधीसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतून उभ्या राहणाऱ्या निधीतून पोलिसांसाठी काही कल्याणकारी योजना राबविणे हा हेतू आहे. या वर्षी प्रथमच अशा निधी संकलनाचे व कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असे नाही. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे; पण या परंपरेचे अंतरंग खूप विचित्र आहे. या कार्यक्रमासाठी निधी गोळा करण्याची जबाबदारी पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर असते. निधी म्हणजे ऐच्छिक रक्कम पण येथे निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले जाते आणि एसपी, डीवायएसपीला, डीवायएसपी पोलिस इन्स्पेक्‍टरला, पोलिस इन्स्पेक्‍टर फौजदाराला, फौजदार कॉन्स्टेबलला रोज झापायला सुरवात होते. या झापाझापीची धग जनतेला लागते आणि निधी वसुलीसाठी प्रसंगी सक्ती केली जाते. मग निधी देतो, जरा आमच्याकडे कानाडोळा करायचा अशा शब्दांची देवघेव होते. निधी उद्दिष्टासाठी सर्वसामान्य पोलिसच विविध ठिकाणी जातो. पूर्वी लोक पोलिसाला घाबरायचे. निधी द्यायचे. आता लोक शहाणे झालेत. मागच्या वर्षीच्या निधीचा हिशेब विचारतात. पोलिसांनी फारच ताणाताणी केली तर ऍन्टी करप्शनची भाषा करू लागतात. या निधी संकलनात पोलिसांनी खूप गोची होते. अक्षरशः उपकाराची भाषा ऐकूण घेऊन हे काम करावे लागते.

अर्थात या निधीतून प्रत्यक्षात पोलिसांवर किती खर्च होतो हा खूप चर्चेचा विषय आहे. किती पोलिसांच्या मुलांना या निधीतून शिक्षणासाठी मदत झाली. किती पोलिसांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यास या निधीतून रक्कम मिळाली. किती पोलिसांना त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या आजारपणात या निधीतून आधार मिळाला याची आकडेवारी खूप कमी आहे; पण पोलिस अधिकारी क्‍लब किंवा त्यातील सजावट यावरच किंवा वरच्या पातळीवरच निधी खर्च होतो हो पोलिसांचा सूर आहे. काही पोलिसांना निधी मिळाला; पण तो पुढे पगारातून कापून घेतला ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे आता तरी या पारंपरिक पोलिस कल्याण निधीचे व त्याच्या खर्चाचे स्वरूप बदलावे अशी पोलिसांची भावना आहे. हा निधी नकोच या टोकाच्या भूमिकेपर्यंत काही जण पोचले आहेत.

स्पष्ट बोलायची चोरी
निधी गोळा करायचा असेल व तो खर्च पोलिसासाठीच खर्च करायचा असेल तर दहा पोलिसांचा या समितीत समावेश असला पाहिजे अशी पोलिसांची माफक अपेक्षा आहे. नाहीतर "ये रे माझ्या मागल्या' हीच परंपरा पुढेही सुरू रहाणार हे स्पष्ट आहे. आता कॉन्स्टेबलही उच्चविद्याविभूषीत आहेत. समाजातील बऱ्या वाईटावर त्यांची नजर आहे. निधीसाठी गावभर पैसे गोळा करत फिरणे, सक्ती करणे, बोलून घेणे हे त्यांना पटत नाही. पण स्पष्ट बोलायची चोरी आहे. त्यामुळे पावत्या फाडणे सुरूच आहे.

Web Title: fund police & development