वेतन पथकात फंड पावत्यांसाठी ‘वेटिंग’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

कोल्हापूर - भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंडाच्या पावत्यांसाठी माध्यमिक वेतन पथकाकडून (पे युनिट) होणाऱ्या दिरंगाईमुळे शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणत्या बाबींची पूर्तता केली की या पावत्या हाती पडतील, अशी विचारणा शिक्षकांतून होऊ लागली आहे. 

कोल्हापूर - भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंडाच्या पावत्यांसाठी माध्यमिक वेतन पथकाकडून (पे युनिट) होणाऱ्या दिरंगाईमुळे शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणत्या बाबींची पूर्तता केली की या पावत्या हाती पडतील, अशी विचारणा शिक्षकांतून होऊ लागली आहे. 

पगारातून भविष्य निर्वाह निधी रकमेची कपात होते. जे शिक्षक सध्या सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत अशांना पावत्यांची गरज असते. त्या शिवाय निवृत्तिवेतनाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही. वेतन पथकातून महिन्याला किमान ५० कोटी इतक्‍या वेतनाचे वाटप होते. माध्यमिक शिक्षण विभागाची आर्थिक नाडी अशी ओळख असलेल्या वेतन पथकातील कारभारासंबंधी अनेक वेळा उलटसुलट चर्चा झाली.

काही वर्षांपूर्वी ‘कुंपणानेच शेत खाल्ले तर...’ या उक्तीप्रमाणे अवस्था झाली. फंडावर कर्ज काढण्यासाठी बनावट लग्नपत्रिका जोडल्या गेल्या.

तालुकानिहाय टेबलचे दर पूर्वी निश्‍चित होते. अनेक अधिकारी आले आणि गेले मात्र पे युनिटच्या कारभारात अपेक्षेप्रमाणे पारदर्शकता आली नाही. मनुष्यबळाची कमतरता आणि डोंगराएवढे काम, अशी विषम स्थिती राहिली.

पगार बिले ऑनलाइन स्वीकारण्यास सुरवात झाल्यापासून थोड्या प्रमाणात गती मिळाली. बिले मंजूर करण्यापासून ते फंडाच्या पावत्या देईपासून पूर्वी अंगवळणी पडलेली सवय काही सुटण्याच्या मार्गावर नाही. एका शिक्षकाने फंडाच्या पावत्यासाठी माहिती आयुक्तांपर्यंत पाठपुरावा केला. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती सेवानिवृत्तीला आली की देण्या-घेण्याच्या बाबी आहेत, त्या लवकर मार्गी लागून उतरत्या वयात वेतन लवकर हाती पडावे, अशी इच्छा असते. पूर्वी फंडाच्या पावत्या शाळांपर्यंत पोचवल्या जात होत्या. तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि राज्य परिषदेचे सध्याचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी फंडाच्या पावत्या वेळेत देण्याचा उपक्रम राबविला होता. नंतर पुन्हा पावत्यांसंबंधी दप्तरदिरंगाई सुरू झाली. पे युनिटचे कार्यालय खुले झाले, की शिक्षक पावतीसाठी दारात उभे राहू लागले आहेत. वेतन पथकाचा कारभार ऑनलाइन झाला; मात्र शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम सोपे होण्यापेक्षा ते दप्तरदिरंगाईमुळे अधिक अवघड होऊन बसले आहे. 

अन्य जिल्ह्यांतील वेतन पथकापेक्षा कोल्हापूर माध्यमिक वेतन पथक फंडाच्या पावत्या देण्यात आघाडीवर आहे. सध्या २०१५-१६ च्या पावत्या देण्याचे काम सुरू आहे. ज्या संस्थेत शाळांची संख्या अधिक असते, त्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या की आकडेमोड करण्यात विलंब होतो. फंडाच्या पावत्या वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी असतील तर सहायक लेखाधिकाऱ्यांना त्यासंबंधी सूचना दिल्या जातील.
- शंकर मोरे, अधीक्षक, माध्यमिक वेतन पथक

Web Title: fund receipt waiting in salary scoud