विडा उचललाय; पण तिढा सुटेना!

अजित माद्याळे - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

गडहिंग्लज - राष्ट्रवादीचा विजयी वारू रोखण्याचा विडा विरोधकांनी उचललाय खरा; परंतु विरोधकांची आघाडी आकाराला येण्यासाठीचा तिढा अजून सुटलेला नाही. यामुळे इच्छुकांची चिंता वाढतच चालली असून माघारीपर्यंत आघाडीचा घोळ सुरूच राहणार की त्यावर शिक्कामोर्तब होऊन प्रचाराचा नारळ फोडणार, याची उत्सुकता आहे. उमेदवारी अर्ज भरून पक्षांचे ए, बी फॉर्म दिल्यानंतरही ‘जैसे थे’च परिस्थिती राहिल्याने गडहिंग्लजचे राजकारण कोणते वळण घेणार, याचीही उत्कंठा शिगेला पोचली आहे. 

सदानंद हत्तरकी गट व स्वाभिमानी संघटनेची तयार झालेली आघाडी पाहिली तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेसरी गटापुरती आकाराला आलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी दुसरी ठरली. या व्यतिरिक्त सर्वसमावेशक आघाडी तयार करण्याच्या हालचाली अद्याप चर्चेतच आहे.  

आमदार संध्यादेवी कुपेकर, ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व जनता दलाची आघाडी होईल, असे वाटत असताना नूल गटावर जनता दल हक्क सांगत असल्याने हे दोघे एकत्र येण्याची आशा अंधूक बनली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वसमावेशक आघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला. पूर्वीच्या हत्तरकी-स्वाभिमानी आघाडीत समावेश होण्यासाठी जनता दल, प्रकाश पताडे गट सक्रिय झाले. तशी चर्चाही सुरू झाली. परंतु अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अप्पी पाटील यांना शह देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीने पताडे यांना हेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते अमर चव्हाणांना नाराज करणे चुकीचे ठरत असल्याने राष्ट्रवादीने हा नाद सोडून दिला. यामुळे पताडे हे स्वाभिमानी व हत्तरकी आघाडीत जाण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना व भाजप दोघेही स्वतंत्रपणे लढण्यावर निश्‍चित झाले आहे. शिवसेनेचा जीव नेसरीत अडकला असून भाजपची अस्मिता नेसरीसह गिजवणे गटातही लपली आहे. यामुळे या दोघांची युती अशक्‍य मानली जाते. रिपाईनेही काही गट व गणात आपल्या उमेदवारांना ए, बी फॉर्म दिले आहेत. महागाव गटात अप्पी पाटील व प्रकाश चव्हाण एकत्र येण्याची शक्यता आहे.

धाकधूक कायम 
राष्ट्रवादी स्वबळावर उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. तालुक्‍यातील सर्व १५ जागांवर त्यांनी ए, बी फॉर्म दिले आहेत. जनता दल, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, ताराराणी आघाडी, काँग्रेसने आपापल्या इच्छुकांना ए, बी फॉर्म दिले आहेत. राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी तयार करण्याचे मनसुबे आधीच धुळीला मिळाले आहेत. आता काही गट-तट व पक्ष एकत्र येवून तशा हालचाली सुरू केल्या असल्या तरी त्यांच्यातील तिढा अजून सुटलेला नाही. एकीकडे पक्षाचा फॉर्म मिळाला म्हणून इच्छुक आनंदित आहेत, तर दुसरीकडे माघारीच्या दिवशी ऐनवेळी राजकारण कोणते वळण घेते, याचीही धाकधूक कायम आहे. 

Web Title: gadhinglaj poltics