esakal | गडहिंग्लज : सेवानिवृत्त शिक्षकाचे दोन लाख लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गडहिंग्लज : सेवानिवृत्त शिक्षकाचे दोन लाख लंपास

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : दवाखान्याच्या खर्चासाठी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव कावणेकर (रा. गांधीनगर) यांनी बँकेतून काढून आणलेले 2 लाख रुपये एका अज्ञात तरुणाने लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कावणेकर यांनी दवाखान्याच्या खर्चासाठी आज सकाळी बँक ऑफ इंडिया व रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीमधून प्रत्येकी एक लाख रुपये काढले. हे दोन लाख रुपये त्यांनी कापडी पिशवीत ठेवले. रवळनाथ संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर घरी जाण्यासाठी मोटरसायकल काढली. त्यावेळी एक चाक पंक्चर झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी पैशाची पिशवी गाडीला अडकवून गाडी ढकलत आजरा रोडवरील शानभाग हॉस्पिटल समोरील वांद्रे पंक्चर दुकानात आले.

हेही वाचा: शरण या किंवा मरा; तालिबानची धमकी देणारी पत्रे दारांवर

तेथे पिशवी काढून कावणेकर यांनी दुकानातील बाकावर ठेवली आणि दुकानदाराला पंक्चर काढण्यास सांगितले. टायर मध्ये मोळा घुसला आहे काय हे पाहण्यासाठी कावणेकर गाडीजवळ गेले. इतक्यात अंगात निळसर शर्ट, जीन्स पॅन्ट, डोक्यावर काळी टोपी घातलेला 20 ते 22 वर्षाचा हिंदी भाषेत बोलणारा एक अनोळखी तरुण आला आणि  कावणेकर यांची नजर चुकवून तो अज्ञात तरुण बाकावर ठेवलेली पैशाची पिशवी घेऊन पसार झाला.

काही वेळाने कावणेकर यांचे बाकाकडे लक्ष जाताच तेथे पिशवी दिसली नाही. शोधाशोध करूनही पिशवी आढळली नाही. त्यामुळे कावणेकर यांची घालमेल सुरू झाली. दरम्यान, तो तरुणही त्याठिकाणी न्हवता. त्यामुळे पैशाची पिशवी घेऊन तो तरुण पसार झाल्याचे लक्षात आले. तातडीने कावणेकर यांनी पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व उपनिरीक्षक एस एस घुले यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास केला. या घटनेचा अधिक तपास श्री घुले करीत आहेत.

loading image
go to top