माणदेशी माणसाची ओळख असणाऱ्या 'गजीनृत्य' खेळाकडे तरुणाईचे दुर्लक्ष 

माणदेशी माणसाची ओळख असणाऱ्या 'गजीनृत्य' खेळाकडे तरुणाईचे दुर्लक्ष 

झरे -  महाराष्ट्राला अनेक लोककलांचा, लोकनृत्यांचा प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) लोकप्रिय आहे. त्यामुळे ते लोकनृत्य माणदेशासह महाराष्ट्रात गजीढोल या नावाने लोकप्रिय आहे.

माणदेशाला गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची उज्वल अशी परंपरा लाभली आहे. युवकांनी खेळाकडे पाठ फिरविल्यामुळे माणदेशी माणसाची ओळख आसणारा गजीनृत्य खेळ फक्त वृध्द माणसाचा राहिला की काय ?  अशीच परिस्थिती राहिल्यास खेळ नामशेष होईल.

माणदेशातील सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, जत, कवठेमहांकाळ या तालुक्‍यासह महाराष्ट्रात गजीढोल मोठ्या प्रमाणात खेळला जातो. गजीढोल नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात. गजनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात, तर ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात. ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो. गजाची घाई लावणाऱ्यास म्होऱ्या म्हणतात. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्वाची असते. रंगीत रुमाल उडवत डाव्या - उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख अंगात तीन बटनी नेहरु शर्ट, डोक्‍यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल व विजार किंवा धोतर घातलेली असा असतो. अनेक ठिकाणी गजनृत्याला चुळण असेही म्हटले जाते.

गजीढोलात नृत्य करणारे गजी अनेक प्रकारे अाहेत. ढोलवादक समुहाचा नायक असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. गजनृत्याच्या पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ - दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. 

ग्रामीण महाराष्ट्रातील यात्रा, जत्रा, सप्ताह, भंडारा, वालुग, दिवाळी, दसरा, यासह अनेक महत्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गजनृत्याचे सादरीकरण केले जाते. चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची रचना वैशिष्ट्‌यपूर्ण आहे.

एक वैशिष्ट्य म्हणजे आरेवाडी परिसरातल्या अशा एका चैतन्यपूर्ण गजनृत्याचा समावेश दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात करण्यात आला होता आणि परदेशातही ते सादर करण्याची संधी त्या कलाकारांना मिळाली होती. परंतु आधुनिक काळातील शिकलेल्या युवा पिढीने माणदेशाची ही लोकनृत्य कला समजावून घेतली पाहिजे व तो वारसा पुढे चालवण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com