बेळगावात गणरायाचे जल्लोषात आगमण

सतीश जाधव
Saturday, 22 August 2020

जल्लोषी वातावरणात बेळगावकरांनी गणरायाचे स्वागत केले.

बेळगाव : पारंपरिक वाद्यांचा गजरात, गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या भाविकांनी नकळत धरलेला ठेका, आकर्षक फुलांनी सजविलेल्या वाहनांत विराजमान झालेली गणरायाची मूर्ती, फटाक्‍यांची आतषबाजी अन्‌ पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले गणेशभक्त अशा अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे शहरात दिमाखात आगमन झाले. 

हेही वाचा - तुम्हाला कोरोना होऊन गेला आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे ? मग ही बातमी वाचाच...

जल्लोषी वातावरणात बेळगावकरांनी गणरायाचे स्वागत केले. गणेशाचे असे साजिरे रूप डोळ्यांत साठविण्यासाठी गणेशभक्तांनी रस्त्यांवर गर्दी केली होती. शहरातील प्रत्येक रस्त्यावर गणरायाचे स्वागत केले जात होते. लहानांबरोबर तरुणाई आणि वृद्धांचाही उत्साह वाखाणण्याजोगा होता. सारे शहर बाप्पामय बनले होते. शुक्रवारी दिवसभर बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकजण तयारी करत होता. ठिकठिकाणी पूजेच्या आणि सजावटीच्या साहित्यासाठी भक्तांची रिघ सुरु होती. शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशीही सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे भक्‍त रिक्षा, ट्रक, टेम्पो, कार आणि दुचाकीवरून गणेशमूर्ती घेऊन जाताना दिसले. 

हेही वाचा - Photo : कोल्हापूरच्या या तरूणींचा यशस्वी प्रयोग ; साडी, शर्ट, मेकअपचे साहित्य अन्‌ दागिने!

 पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरात मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकीत पुरुष पांढरे कपडे व फेटे तर महिला-युवती भगवे फेटे परिधान करून उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. बाप्पांचा पहिला फोटो, सेल्फी घेण्यासाठी प्रत्येकाची घाई दिसत होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरोघरी श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना केली. सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती. श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुपारनंतर पूजा झाली. कोरोना संकटातून बाप्पा आम्हांला लवकर दूर करा, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान शांतता राहावी यासाठी पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival start in belgum